भिंत पडल्याच्या घटनेला दोन महिने उलटूनही परिस्थिती ‘जैसे थे’; अतिक्रमणे तोडण्याचा पालिकेचा निर्णय कागदावरच

डोंगरावरील अतिक्रमणामुळे रेल्वे वाहतुकीसाठी धोकादायक झालेल्या पारसिक बोगद्यावरील संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटनेला दोन महिने उलटूनही ठाणे महापालिकेतर्फे काहीच कारवाई झालेली नाही. मुंब्रा येथील ही अवैध बांधकामे तोडून संरक्षक भिंत उभारली जाईल, असे आश्वासन ठाणे महापालिकेतर्फे देण्यात आले होते. मात्र संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेल्याने आता या ठिकाणी संरक्षक भिंतच अस्तित्त्वात नाही. विशेष म्हणजे या भागात असलेले शौचालय, गटारांवरील सिमेंटची आच्छादने ठाणे महापालिकेने तोडल्याने येथील रहिवाशांना आरोग्याच्या समस्यांसह विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

जून महिन्यात २१ तारखेला पारसिक बोगद्याच्या मुंब्रा बाजूकडील संरक्षक भिंत कोसळण्याचा प्रकार घडला होता. या भिंतीचा काही भाग रुळांवर पडल्याने रेल्वेने तातडीने साडेतीन तासांचा विशेष ब्लॉक घेऊन या भिंतीचा कोसळणारा भाग ठाणे महापालिकेच्या साहाय्याने पाडला होता. त्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णयही घेतला. ही जागा वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर पालिकेने कारवाईचे काम सुरू करीत उर्वरित संरक्षक भिंत, येथे असलेले शौचालय, गटारांवरील आच्छादने तोडली होती.

दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पालिकेने आपली कारवाई स्थगित केली. ही कारवाई पुढे न सरकल्याने पारसिक बोगद्यावर सध्या संरक्षक भिंत अस्तित्वात नाही. या ठिकाणी तीव्र उतार असल्याने दरड किंवा डोंगराचा काही भाग कोसळल्यास ते रेल्वे वाहतुकीला धोकादायक ठरू शकते. याबाबत रेल्वेच्या अभियंता विभागातील अधिकाऱ्यांना विचारले असता, ठाणे महापालिकेला आम्ही संरक्षक

भिंतीचा आराखडा सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिकेने केलेल्या अर्धवट पाडकामामुळे येथील रहिवाशांना प्रचंड त्रास होत आहे. पालिकेने येथील गटारांवरील आच्छादने उडवल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील एकाच घरातील तीनपैकी दोन मुलांना मलेरिया आणि डेंग्यू झाल्याचे येथील महिला रहिवासी कैसर जहान यांनी सांगितले. तर, प्रकरण न्यायालयात गेल्याने याबाबत कधी निर्णय होईल, हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे आमचे हाल असेच चालू राहणार की काय, असा प्रश्न अहमद शकील अन्सारी या रहिवाशाने उपस्थित केला.