अंबरनाथमध्ये श्रमजीवी संघटनेतर्फे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या विरोधात अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून त्यांचा निषेध करण्यात आला. तसेच यासंदर्भात एक लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. कुपोषित बालकांना केंद्राचा निधी बंद झाल्याने ही निदर्शने करण्यात आली.
तालुक्यातील कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, संपूर्ण जिल्ह्य़ातील कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. पालघर जिल्ह्य़ातील एकटय़ा जव्हार तालुक्यात तब्बल पाच हजार कुपोषित बालके आहेत. या बालकांसाठी असलेला केंद्राचा निधी बंद झाल्याचे सांगत कुपोषित बालकांवर उपचार करणारी गरम बाल विकास केंद्रेच बंद करण्यात आली आहेत. याबाबत मंत्री विष्णू सावरा यांना विचारले असता त्यांनी कुपोषित बालकेच नसल्याचे उत्तर देऊन थट्टा केली असल्याचे म्हटले आहे.
गरम बाल विकास केंद्र बंद करून नव्याने ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना सुरूकरण्यात आली आहे. या योजनेत कुपोषित बालकांबाबत उपाय नसल्याचे सांगून कुपोषण कसे दूर करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वक्तव्याचा त्यांनी विचार करून कुपोषित बालकांसाठी न्याय्य भूमिका घ्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्न्ो, तालुका सचिव सुनील वाघे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.