ठाणे / अंबरनाथ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शुक्रवारी भिवंडी शहरात सुमारे ५० हजार मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरले. मोर्चाच्या कालावधीत भिवंडी शहरातील एसटी सेवाही बंद करण्यात आली होती. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना सहन करावा लागला. अनेकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने आणि कारखाने बंद ठेवले होते.

विशेष म्हणजे, हा मोर्चा कोणत्याही संस्थेने आयोजित केला नव्हता. व्हॉट्सअ‍ॅपवर मिळालेल्या संदेशाच्या आधारावर आम्ही एकत्र जमल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे होते.  अंबरनाथमध्येही हजारो आंदोलकांनी या कायद्याला विरोध केला. या कालावधीत कल्याण-बदलापूर राज्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

भिवंडी महापालिकेच्या मुख्यालयाजवळ मोर्चा आयोजित करण्याचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पसरविले जात होते. ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांचा प्रचंड फौजफाटा निजामपुरा भागात तैनात करण्यात आला होता. तर, दुपारी १२ वाजल्यापासूनच राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाडय़ांची सेवा बंद करण्यात आली होती. दुपारी ३ वाजता नमाज पठण केल्यानंतर भिवंडीतील प्रत्येक भागातून मुस्लीम बांधवांचे जथ्ये भिवंडी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले होते. अवघ्या २० मिनिटांत ५० हजार मोर्चेकरी प्रवेशद्वाराजवळ जमले. राष्ट्रध्वज फडकवत अनेकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणबाजी केली. या मोर्चेकऱ्यांमध्ये १२ ते १५ वर्षांची मुलेही सहभागी झाली होती. तब्बल साडेतीन तास या मोचरेकऱ्यांची घोषणाबाजी सुरू होती. संयम दाखवित ५.३० वाजता जमाव पुन्हा माघारी जाऊ लागला.

बंदच्या कालावधीत भिवंडीत जाणारी एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत एसटीसेवा बंद ठेवल्याने त्याचा फटका शहरातील शेकडो नागरिकांना बसला. तर, काही दुकानदार, गोदामे आणि कारखानदारांनीही उत्स्फूर्तपणे बंद पाळला होता.

अंबरनाथमध्येही या कायद्याविरूद्ध विविध संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. कोहोजगाव येथील बाबा हजरत गैबनशाह वली दर्गा येथून कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून हा मोर्चा अंबरनाथच्या तहसील कार्यालयावर धडकला. यात हजारोच्या संख्येने मोर्चेकरी सहभागी झाले  होते.

अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने या निषेध मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी २.३० च्या सुमारास हा मोर्चा कल्याण-बदलापूर राज्यमार्गाने तहसील कार्यालयाकडे निघाला. देशभरातील हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोर्चाच्या मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

कल्याण बदलापूर राज्य मार्गावरून हा मोर्चा निघाला. त्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे मोर्चाच्या काळात तासभर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तीनच्या सुमारास हजारोंच्या संख्येने मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.

नायब तहसीलदार संभाजी शेलार यांनी निवेदन स्विकारले.