गावांविरोधात भूमिका घेतल्याने वसईत मुख्यमंत्र्यांचा निषेध

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना गावांच्या बाजूने लढत असल्याचे दाखवले होते. त्याच फडवणीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर गावांच्या विरोधात निर्णय घेतल्याने वसईमध्ये त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांचे निषेध करणारे फलक वसईच्या गावांमध्ये लागले असून सभांमधून त्यांचा जाहीर धिक्कार करण्यात येत आहे.

वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्यासाठी वसईच्या ग्रामस्थांचा न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना राज्य सरकारने २९ गावे पालिकेतून वगळण्याचा अध्यादेशच रद्द करून टाकला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना फसविल्याची भावना वसईच्या ग्रामस्थांमध्ये रुजली आहे. पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांनीही ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहत मुख्यमंत्र्याच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. गुरुवारी संध्याकाळी निर्मळ येथे गावांच्या प्रश्नावर जनआंदोलन समितीने सभा आयोजित केली होती. समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या धिक्कार करणारे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत.

वसईच्या भूमाफियांशी संधान बांधून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सर्वाना एकत्र घेऊन हा लढा अधिक तीव्रतेने पुढे नेण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

प्रदेशाध्यक्षांना भूमिका समजावून देणार

भाजपचे नवनिर्वाचित वसई-विरार जिल्हाध्यक्ष सुभाष साटम या सभेला उपस्थित होते. वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळली पाहिजे, ही ग्रामस्थांची भूमिका प्रदेशाध्यक्षांना समजावून सांगितली जाईल. त्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले.