अभिनेता संतोष जुवेकर म्हणजे प्रेक्षकांसाठी आपल्यातीलच एक माणूस असे म्हणावेसे वाटेल अशा त्याच्या मोठय़ा पडद्यावरील भूमिका असतात. रूपेरी पडद्यावरील ‘झेंडा’मधील भूमिका संतोष जुवेकरची सर्वात आवडती भूमिका आहे. मधल्या काळात रूपेरी पडद्यावर अधिक दिसणारा संतोष कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकेद्वारे खूप दिवसांनी छोटय़ा पडद्याच्या प्रेक्षकांसमोर आला आहे. महाविद्यालयात शिकत असताना एकांकिका, नाटके यातून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या संतोषने रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही ठिकाणी स्वत:चे वलय निर्माण केले आहे. मनोमय कलामंच आणि वसुंधरा थिएटर या ग्रुपद्वारे मुंबईतल्या खुल्या एकांकिका स्पर्धा असो, आंतरमहाविद्यालयीन असो की गणपती उत्सवांमध्ये सादर केलेल्या अशा अनेक एकांकिकांमधून त्याने काम केले आहे. त्यानंतर ‘या गोजिरवाण्या घरात’, ‘बेधुंद मनाच्या लहरी’, ‘वादळवाट’ यांसारख्या मालिकांनी संतोषला लोकप्रियता मिळवून दिली.

’आवडते मराठी चित्रपट – ‘झेंडा’, ‘उंबरठा’, ‘काकस्पर्श’.
’आवडते हिंदी चित्रपट – ‘प्यासा’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’.
’आवडती नाटकं – ‘आणि मकरंद राजाध्यक्ष’, ‘सुखांशी भांडतो आम्ही’.
’आवडते दिग्दर्शक – संजय जाधव, मंदार देवस्थळी, गिरीश मोहिते, निशिकांत कामत, सतीश राजवाडे, राजीव पाटील.
’आवडलेल्या भूमिका – अमिताभ बच्चन यांची ‘जंजिर’मधील भूमिका, ‘नटसम्राट’मधील आप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका, ‘गॉडफादर’मधील अल पचिनो, मार्लन ब्रॅण्डो यांच्या भूमिका.
’आवडते चरित्र कलावंत – दिवंगत आनंद अभ्यंकर, अभिनेत्री सुहास जोशी, नीना कुलकर्णी, भारती आचरेकर, वंदना गुप्ते.
’आवडते लेखक – मधु मंगेश कर्णिक, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, मिलिंद बोकील.
’आवडलेली पुस्तकं – ‘शाळा’, ‘तुंबाडचे खोत’, ‘झाडाझडती’, ‘माहीमची खाडी’, ‘रारंगढांग’.
’आवडता खाद्यपदार्थ – कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा.
’आवडते फूडजॉइण्ट्स – मामलेदार मिसळ, सुरूची मिसळ, बबनचं पायासूप, हेमंत कॅटर्स खानावळ.
’आवडती हॉटेलं- पुरेपूर कोल्हापूर, मेतकूट, गोखले उपाहारगृह.
’ठाणे जिल्ह्यातील आवडता पिकनिक स्पॉट – येऊर, अर्नाळा किल्ला.
’ठाणे-कळवाविषयी.. : माझा जन्मच खारीगांव-कळवा इथला आहे. एस. व्ही. पी. एम. शाळा आणि एन. के. टी. कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालंय आणि आमचा नाटकाचा ग्रुप मनोमय कलामंच आणि वसुंधरा थिएटर हा ग्रुपही ठाणे परिसरातीलच होता. त्यामुळे माझ्यातील कलावंताला प्रेरणा देणारी माणसं तर इथलीच आहेत. जन्मापासून राहत असल्यामुळे असो की नंतर कळत्या वयात भेटलेली मित्रमंडळी असोत, माझी जडणघडण हीच मुळात ठाणे- कळवा- खारीगांव इथली आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि परिसराचा नितांत, प्रांजळ अभिमान आहेच. लहानपणापासून हा सगळा परिसर मी पाहत आलोय. बदल झालेत, होणारच. शहराचा विकास झाला ही चांगलीच बाब असली तरी हा विकास होत असताना लहानपणी झाडेझुडपे, निसर्गसुंदर असलेले ठाणे राहिले नाही. निसर्गावर विपरीत परिणाम झाला याची खूप खंत वाटते. घोडबंदर परिसरात घनदाट जंगल होते, तिथे आता फक्त इमारतींचे जंगल झाले आहे. ठाणेकर म्हणून मला कायमच अभिमान वाटतो. परंतु सर्वपक्षीय नेत्यांना मी विनंती करीन की, बॅनर, होर्डिग्जमधून दिसणारे नेते असण्यापेक्षा प्रत्यक्ष कामातून त्यांनी आपले नेतेपण ठाणेकरांना, खारीगांववासीयांना दाखवून दिले तर अधिक आनंद होईल. तलावांचे शहर ठाणे अशी ओळख असताना तलावांची जपणूक करणे. अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे अनेक पुरातन वास्तू ठाण्यात आहेत, ज्या ठाणेकर म्हणून अभिमानास्पद ठरतात. परंतु त्याचे जतन-संवर्धन केले पाहिजे. बेशिस्त वाहतूक, प्रचंड रहदारी अशा आणि यापेक्षाही गंभीर समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी नेत्यांनी इच्छाशक्ती दाखविण्याची नितांत गरजेची अपेक्षा माझ्यासारखे असंख्य ठाणेकर करीत असतील, असेही वाटते.
शब्दांकन – सुनील नांदगावकर
अभिनेता संतोष जुवेकर