मत्स्यविकासमंत्र्यांकडे मागणी

वसईतील मासळीला मुंबईतून मोठी मागणी असून वसईतील अनेक मासेविक्रेत्या महिला अधिक नफा मिळविण्यासाठी मुंबईत मासळी विकण्यासाठी जातात. या व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेकडो महिला मासेविक्री परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत.

महिला दिनानिमित्त ८ मार्च २०१८ रोजी लोकसत्ता वसई विरार सहदैनिकात वसईतील कोळी महिलांवर आधारित ‘संकटांना बाजूला सारून कोळी महिलांचा जगण्यासाठीचा लढा’ ही  बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीद्वारे वसईतील कोळी महिलांचा मुंबईपर्यंत मासळी विकण्यासाठी जाण्यापर्यंतचा प्रवास उलगडला होता. कोळी महिलांची परवड लक्षात घेऊन या बातमीच्या आधारे जनसेवा फाऊंडेशनने मत्स्यविकासमंत्र्यांकडे वसईतील कोळी महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे.

मुंबईमध्ये मासळीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते.  या मासळी बाजारात वसई नायगावमधील शेकडो महिला वसईची मासळी विकण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठेमध्ये जातात. ‘मुंबई मालाड मार्केट महिला संघ’ या नोंदणीकृत संघाद्वारे हा मासेविक्रीचा व्यवसाय मुंबईच्या बाजारात करत आहेत. अशा प्रकारे परवड होत असून यासाठी या महिलांना कायमस्वरूपी मासेविक्रीसाठी परवाने आणि मासेविक्रीसाठी डोक्यावर छत असावे अशी मागणी जनसेवा फाऊंडेशनच्या विजय वैती यांनी मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली आहे. कोणत्याही प्रकारची सुविधा नसताना आम्हाला बाजारकर भरावा लागत आहे. तसेच अजूनही परवाने उपलब्ध झाले नसल्याने कोणत्याही क्षणी आमच्या व्यवसायावर कारवाई होऊ शकते, असे मत्स्यविक्रेत्या प्रीती वैती यांनी सांगितले.