16 January 2019

News Flash

‘पापडखिंड’चा मृत्यू अटळ

विरार पूर्वेला फुलपाडा येथे असलेले पापडखिंड हे वसई-विरार शहरातील पहिले धरण आहे.

पापडखिंड धरण बंद केल्यास ‘वॉटर पार्क’ अस्तित्वात येईल.

‘वॉटर पार्क’साठी कोटय़वधी रुपयांची तरतूद

विरारचे पापडखिंड धरण बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या अंगलट आल्याने सारवासारव करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी धरणातील पाण्याचा पिण्यासाठीचा वापर बंद करून त्यात नौकाविहार वा वॉटर पार्क उभारण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करून ठेवल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे येत्या काळात पापडखिंड धरणाचा मृत्यू अटळ असल्याचे स्पष्ट आहे.

विरार पूर्वेला फुलपाडा येथे असलेले पापडखिंड हे वसई-विरार शहरातील पहिले धरण आहे. त्यातून शहराला रोज १ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो. पापडखिंड धरण बंद करून या ठिकाणी वॉटर पार्क बनविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शहरात पाणीटंचाई असताना सुस्थितीतील धरण बंद करण्याच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. त्यामुळे वसई-विरार पालिकेने सावध पवित्रा घेतला होता.

पालिकेच्या अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्षांत पापडखिंड धरणाच्या सौंदर्यीकरणासह इतर तलावांच्या सुशोभीकरणासाठी ४२ कोटी ५८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विकास कामे करताना आधी अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवावी लागते. त्यानंतर अंतिम आराखडा तयार होऊन पुढील निधी मंजूर केला जातो. इतर तलावांचे सुशोभीकरण करत असताना पापडखिंड तलावाचे सुशोभीकरण करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. हे सुशोभीकरण म्हणजेच धरण बंद करून वॉटर पार्क बनविण्याचा एक भाग असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे.

पापडखिंड धरण बंद करून तेथे मनोरंजनासाठी वॉटर पार्क उभारण्यात यावे, असे धोरण विरार नगर परिषद असताना संमत करण्यात आले होते. २००६च्या विरार नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या जाहीरनाम्यातही पापडखिंड धरण बंद करून करमणुकीचे क्षेत्र विकसित करण्याचा मुद्दा होता. शहर अद्याप टॅंकरमुक्त नसताना तसेच पाणीटंचाई असताना सुस्थितीतले हे धरण बंद करू नये यासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी वसई-विरार शर महानगरपालिकेविरोधात आंदोलन पुकारले आहे.

वॉटर पार्कचा अद्याप अधिकृत प्रस्ताव नाही. शहरातील इतर तलावांच्या सुशोभीकरणासाठी या रकमेची तरतूद केलेली आहे.

अधिकारी, वसई-विरार महानगरपालिका 

First Published on April 17, 2018 3:21 am

Web Title: provision of billions rupees in municipal budget for boating and water park in pappadkhind dam