परिसरात दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य

भाईंदर : पावसाळ्याअगोदर खबरदारी म्हणून केलेल्या वृक्ष छाटणीचा फटका ऑगस्ट ओसरला तरी मीरा भाईंदरवासीयांना बसत आहे. शहरात अनेक भागांत करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीच्या फमंद्या कित्येक दिवसांपासून  उचलण्यात येत नसल्याने त्या कुजून परिसरात दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्याचबरोबर फांद्यांमुळे डासांचा त्रास वाढल्याने रोगराईचे सावट घोंगावत आहे.

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या उद्यान विभागांकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी  झाडांची छाटणी करणे, धोकादायक झाडे तोडणे, नवीन झाडे लावणे , झाडांची सुरक्षा व्यवस्था पाहणे अशी अनेक कामे  केली जातात. पावसाळ्यापूर्वी मोठमोठय़ा व रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी केली जाते. परंतु पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शहरातील अनेक भागांत वृक्ष छाटणी झाली नसल्याचे दिसून येत आहे.अशा परिस्थितीत शहरात काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे हवेमुळे उन्मळून पडली आहेत तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वाकल्याने झाडे धोकादायक अवस्थेत आली आहेत.

मीरा भाईंदर शहरातील हाटकेश, बेकरी गल्ली, कस्तुरी रुग्णालयात मार्ग आणि शिर्डी नगर परिसरात गेल्या १५ दिवसांपूर्वी वृक्ष छाटणी करण्यात आली होती. परंतु वृक्ष छाटणी केल्यानंतरदेखील त्या भागातील फमंद्या रस्त्यावरून उचलल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण परिसर कचऱ्याने व्यापला गेला असून मोठय़ा प्रमाणात मच्छर आणि डास वाढले

आहेत. याचा परिणाम या भागातील राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तसेच हा कचरा लवकरात लवकर उचलून घ्यावा अन्यथा तो जाळून टाकण्यात येईल अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

महापालिकेने झाडांच्या छाटलेल्या फांद्या उचलेल्या आहेत. ज्या परिसरत हे काम झाले नसेल तिथे लवकरच उचलण्याच्या सूचना दिल्या जातील.

– नागेश विरकर, उद्यान निरीक्षक