महाराष्ट्रीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेल्या पु.लं.च्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ प्रत्येक मराठी मनाला आहे. त्यांच्या अनेक व्यक्तिरेखांची पारायणे करणारे असंख्य रसिक आहेत. नव्या पिढीतील वाचकही त्यांच्या अभिजात विनोदी शैलीच्या प्रेमात आहेत. पु.ल. म्हणजे मनमुराद आनंद हे समीकरण अजूनही कायम आहे. पु.लं.च्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी डोंबिवलीत आयोजित ‘पुलकित’ कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी या आनंदयात्रेचा लाभ घेतला.
पु.ल.देशपांडे यांच्या १६ व्या स्मृतिदिनानिमित्त अष्टगंधनिर्मित पुलकित हा विशेष कार्यक्रम डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. मार्मिक, चोखंदळ विनोद करणारे पुलं सर्वानाच आवडतात. मात्र तेवढय़ापुरतीच त्यांची ओळख मर्यादित नाही. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. साहित्यासोबतच संगीत, अभिनय, वक्तृत्व, शिक्षण, नाटय़ अशा विविध माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर टाकली. त्यांचे व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक व्यक्तिचित्रणाचा आदर्श वस्तुपाठ आहे. डोंबिवलीतील कार्यक्रमातही पुलंच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गणेशवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर मयूर सुकाळे या गायकाने आपल्या सुरेल आवाजात ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटातील ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ हे गाणे सादर केले. विघ्नेश जोशी यांनी त्यांना संवादिनीवर साथ दिली तर कल्याणी जोशी यांनी टाळ वाजवून वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर ‘देव पावला’ या चित्रपटात संगीत दिलेले ‘कबिराचे विणतो शेले’ या गाण्याचे सादरीकरण कल्याणी जोशी यांनी केले. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले. एक विनोदी लेखक म्हणून पुलं बहुपरिचत आहेत. मात्र संगीतकार म्हणूनही त्यांनी मोठे काम करून ठेवले आहे. त्याची झलक या पहिल्या सत्रात घडली. यावेळी विघ्नेश जोशी यांनी पु.लंच्या काही आठवणी जाग्या केल्या.
एकदा पुलंना एकाने विचारले, काय हो, मैफलीमध्ये बहुतेकदा यमन आणि भैरवी हे दोनच राग जास्त प्रमाणात का गायले जातात? तेव्हा पुलंनी दिलेले उत्तर मार्मिक होते. ते म्हणाले, कारण हे दोन राग अगदी गाढवाने गायले तरी गोडच वाटतात.
त्यानंतर हौसेसाठी प्रवास करणाऱ्या ‘टुरिस्ट’ला काय म्हणतात असे जेव्हा पुलंना विचारले गेले, तेव्हा त्यांनी ‘सफरचंद’ असे संबोधत असल्याचे मार्मिक पण विनोदी उत्तर दिले. त्यांनी एअर होस्टेसला हवाई सुंदरी असे म्हणतात तर मग परिचारिकेला दवाईसुंदरी असे का म्हणत नाही हा प्रश्नही पुलंनी उपस्थित केला होता. जेवण वाढणारा जर वाढपी असेल तर विमान चालविणारा उडपी का नाही अशी मिश्किल टिप्पणी पुलंनी केल्याचे किस्से निवेदक दिनेश मोरी यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर वाऱ्यावरची वरात, व्यक्ती आणि वल्ली, तुज आहे तुजपाशी अशा काही नाटकांचे प्रवेश येथे सादर करण्यात आले. त्यानंतर अभिनेते अतुल परचुरे यांनी ‘मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ या पुलंच्या पुस्तकातील काही भागाचे वाचन केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ.गिरीश ओक यांनी त्यांच्या काही आठवणी रसिकांना सांगितल्या. यावेळी सुनील तावडे, रसिका धामणकर, अंजली मायदेव, प्रदीप पटवर्धन यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. पु.लंच्या हजरजबाबीपणाच्या या कथा अकबर बिरबलाच्या कथेप्रमाणेच संपूच नयेत असे रसिक प्रेक्षकांना वाटत होते. डॉ.गिरीश ओक आणि रसिका धामणकर यांनी ‘ती फुलराणी’ या नाटकातील प्रवेश सादर केले.
भाग्यश्री प्रधान

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
uddhav thackeray and kangana
“भाजपाई कंगनाने तिचे अगाध ज्ञान पाजळून इतिहासाची…”, ठाकरे गटाचा टोला
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान