सर्व स्पर्धकांना ‘ठार’ करून शेवटपर्यंत जिवंत राहण्याची स्पर्धा असलेल्या ‘पबजी’ गेमच्या व्यसनामध्ये अनेक तरुणमंडळी अडकली आहे. कल्याणमध्ये पबजीचे व्यसन असलेल्या तरुणाने मोबाइलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजनीश राजभर (27) असे आरोपी हल्लेखोर तरुणाचे नाव असून ओम भवडनाकर (32) जखमी झाले आहेत. ओमचं आणि रजनीशच्या बहिणीचं लग्न जमलं होतं. गेल्या गुरुवारी ओम होणाऱ्या पत्नीच्या घरी गेला होता. ओमच्या होणाऱ्या पत्नीचा भाऊ रजनीश राजभर हा मोबाइलवर पबजी गेम खेळत होता. त्यावेळी मोबाइलची बॅटरी उतरल्याने त्याने मोबाइल चार्जिंगला लावला. तेव्हा चार्जरची केबल कापलेली असल्याचे दिसले. त्यामुळे तो फोन चार्ज करू शकत नव्हता. त्यावेळी त्याची बहिणी व तिचा होणारा नवरा ओम हे घरात होते.

रजनीशने बहिणीकडे चार्जरविषयी विचारणा केली, आपल्याला कल्पना नसल्याचं बहिणीने सांगितल्यावर तिनेच चार्जरची वायर कापल्याचा आरोप त्याने तिच्यावर केला. परंतु आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे तिने सांगितले. त्यामुळे संतापलेल्या रजनीशने चाकूने बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापली. यामुळे घरात वाद झाला. ओमही रजनीशला रागाने बोलला आणि ओमने त्याला पबजीच्या व्यसनावरून हटकले.

त्यामुळे आधीच गेम अर्धवट राहिल्याने संतापलेल्या रजनीशचा रागाचा पारा आणखी चढला. त्याने वायर कापलेल्या चाकूने थेट ओम यांच्यावर हल्ला केला आणि ओमच्या पोटात चाकू खुपसला. यानंतर ओमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ओम यांनी या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pubg game addiction knife attack by youth in kalyan
First published on: 16-02-2019 at 03:11 IST