वसईच्या समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फी झोनचे फलक

मरीन ड्राइव्ह येथे सेल्फीची बळी ठरलेल्या प्रीती पिसे या तरुणीच्या मृत्यूनंतर समुद्रकिनारी उत्साहाच्या भरात काढल्या जाणाऱ्या सेल्फीचा आणि त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंबंधी जनजागृती करण्यासाठी वसईतील सामाजिक संस्थेने वसई तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर सावधगिरीचा इशारा देणारे फलक लावले आहेत. विशेष म्हणजे या फलकांवर या संस्थेने प्रीतीचे छायाचित्र लावले असून पुन्हा अशी दुर्घटना घडू नये म्हणून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

प्रीती पिसे या तरुणीचा बुधवारी मरीन ड्राइव्ह समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी काढण्याच्या नादात समुद्रात बुडून मृत्यू झाला. तिच्या हलगर्जीमुळे झालेला मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. वसईतील सोमवंशी क्षत्रिय समाज या संस्थेने अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या संस्थेच्या मोहिमेचा भाग म्हणून समुद्रकिनारी ‘नो सेल्फी झोन’ घोषित करावे, तेथे सेल्फी काढण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. मात्र केवळ मागणीवर न थांबता त्यांनी स्वखर्चाने समुद्रकिऱ्यावर फलक लावले आहेत. अन्र्नाळा समुद्रकिनाऱ्यावर प्रीतीचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आला आहे. ‘मी सेल्फीची बळी ठरले, तुम्ही ठरू नका. क्षणिक आनंदासाठी जीव गमावू नका,’ असे आवाहन त्यांनी या फलकांद्वारे केले आहे. अर्नाळ्याप्रमाणे वसईतील सुरूची बाग, रानगाव, राजोडी, कळंब, केळवा आदी समुद्रकिऱ्यांवरही असे फलक लावले जाणार आहेत.

अर्नाळा समुद्रकिनारा सर्वात धोकादायक आहे. अनेक तरुण येथे उत्साहात पाण्यात शिरून सेल्फी काढत असतात. त्यांचा तोल जातो आणि दुर्घटना घडतात म्हणून येथून सुरुवात केल्याचे सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष विलास चोरघे यांनी सांगितले. प्रीती पिसे दुर्दैवी ठरली. त्यापासून बोध घेऊन इतरांनी सावधगिरी बाळगावी. सेल्फी कुठे काढावा, कुठे काढू नये याचे भान बाळगा, असे आवाहन त्यांनी केले आहे.