19 October 2019

News Flash

सलग २१ दिवस सायकल जनजागृतीचा संदेश

डोंबिवलीतील सायकल क्लबचा आगळ्यावेगळया उपक्रम

(संग्रहित छायाचित्र)

डोंबिवलीतील सायकल क्लबचा आगळ्यावेगळया उपक्रम

ठाणे : डोंबिवली येथील सायकल क्लबतर्फे  सायकल जनजागृतीसाठी एका आगळ्यावेगळया उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत सायकल क्लबच्या सदस्यांनी सलग २१ दिवस दैनंदिन वापरासाठी सायकलीचा वापर करत सायकल जनजागृतीचा संदेश दिला. या उपक्रमात सायकल क्लबच्या सर्व वयोगटांतील सदस्यांनी सहभाग घेतला.

सायकल फेरीत सहभागी झालेल्यांना मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज पार केलेल्या अंतराची नोंद करायची होती. तसेच सदस्यांनी पार केलेल्या अंतराची माहिती समाजमाध्यमे आणि ब्लॉगच्या माध्यमातून क्लबला देणे बंधनकारक होते.

पाच निकषांच्या आधारे सहभागी झालेल्या सदस्यांचे गुणांकन करण्यात आले. सायकल फेरीच्या शेवटच्या दिवशी पाच उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करण्यात आली. निवड करण्यात अलेल्या पाच स्पर्धकांना सायकल क्लबतर्फे  एक वर्षांच्या सायकल देखभाल दुरुस्तीमध्ये विशेष सूट देण्यात आली आहे.

सायकल फेरीत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मॉडेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनय भोळे आणि डोंबिवली जिमखान्याचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सायकल क्लबच्या पुढील उपक्रमात डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर आणि नवी मुंबई या भागांत वृक्षारोपण करण्यासाठी सायकलद्वारे बीजारोपण केले जाणार असल्याचे क्लबचे डॉ. सुनील पुणतांबेकर यांनी सांगितले.

First Published on May 14, 2019 1:07 am

Web Title: public awareness message for 21 consecutive days on cycle