ठाणे येथील डॉ. काशीनाथ नाटय़गृहासमोरील नाथ पै मार्गावर मधोमध असलेले सात अतिउच्च दाबाचे विद्युत खांब हटविण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, हे खांब अद्याप जैसे थे स्थितीतच आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेल्या खांबांमुळे एखादी दुर्घटना घडू शकते. यामुळे हे विद्युत खांब लवकरात लवकर हटविण्याची मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे.
ठाणे येथील वसंतविहार, लोकपुरम, डॉ. घाणेकर आदी परिसरांत जाण्याकरिता नाथ पै मार्गाचा अनेक जण वापर करतात. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या जटिल होऊ लागली होती. तेव्हा अनेकजण नाथ पै मार्गाचा घोडबंदला जाण्यासाठी वापर करीत होते. आजही या मार्गावरून अनेकजण घोडबंदरला जाण्याकरिता वापर करतात. गेल्या काही वर्षांपूर्वी नाथ पै मार्गाचे रस्ता रुंदीकरण करण्यात आले. या रुंदीकरणात गांधीनगर पाण्याची टाकी ते डॉ. घाणेकर नाटय़गृहापर्यंत असलेले अतिउच्च दाबाचे विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध आले. या कामादरम्यान हे खांब दुसरीकडे स्थलांतरित करायला हवे होते. मात्र, महापालिकेने तसे केले नाही. रस्त्याच्या मधोमध खांब असल्याने एखादे वाहन धडकून अपघात घडू शकतो किंवा विद्युत खांब कोसळूनही अपघात घडू शकतो, अशी भीती येथील रहिवाशांना आहे. यामुळे हे विद्युत खांब हटविण्याची मागणी पुढे आली होती. मध्यंतरी, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे विजेचे खांब हटविण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनाला पाच महिने उलटले तरी अद्याप महापालिकेने कोणतीच कारवाई केलेली नाही. यामुळे आपचे कार्यकर्ते पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. दरम्यान, बेस्ट कादंबरीकार सुदीप नगरकर यांच्या अंगावर विजेचा खांब कोसळून झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर खांब हटविण्याची मागणी पालिकेकडे केल्याची माहिती आपचे पदाधिकारी संजीव साने यांनी दिली.