भगवान मंडलिक

कल्याण डोंबिवली पालिका योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्य़ात अव्वल ठरल्याचा दावा

कल्याण : मागील वर्षभरात करोनाने बाधित होऊन महापालिका, शासनाने निश्चित केलेल्या करोना रुग्णालयांमध्ये उपचार घेतलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील नऊ हजार ८९० करोना रुग्णांना शासनाच्या आरोग्य योजनेतील महात्मा फुले ‘जनआरोग्य’ योजनेचा लाभ मिळाला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सोसायटीने निश्चित केलेल्या  जिल्ह्य़ातील ७१ करोना रुग्णालये, काळजी केंद्रांमध्ये या रुग्णांनी उपचार घेतले आहेत. या योजनेचा निधी आणण्यात कल्याण डोंबिवली पालिका ही जिल्ह्य़ात अव्वल क्रमांकावर आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील राज्यातील रहिवाशांना महात्मा फुले जनआरोग्य सोसायटीने निश्चित केलेल्या सरकारी, खासगी रुग्णालयांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या अनेक व्याधींवर मोफत उपचार मिळावेत म्हणून ही योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेतून दीडशेहून अधिक व्याधींवर उपचार केले जातात. हा लाभ घेण्यासाठी लाभार्थी रुग्णाकडे केशरी, पिवळी शिधापत्रिका असावी लागते. गेल्या वर्षी मार्चमध्ये करोना विषाणूची महामारी सुरू झाली. या आजाराचा खर्च अनेक रुग्णांना परवडेनासा झाला. याविषयी विविध स्तरावर आवाज उठविण्यात आला. त्यानंतर शासनाने करोनाची बाधा झालेल्या सर्व उत्पन्न गटातील आणि शासन, पालिकेने निश्चित केलेल्या करोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट-सप्टेंबरपासून करोना रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात आला. लाभ घेतलेल्या करोना रुग्णांचा सर्व खर्च स्थानिक पालिका प्रशासनाने केला.

रेमडेसिविर इंजेक्शन आणि बा वैद्यकीय सेवेचा खर्च रुग्णांकडून घेण्यात आला. रुग्णावर झालेला खर्च शासनाने जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून बाधित रुग्ण संख्येप्रमाणे पालिकेच्या तिजोरीत वेळोवेळी जमा केला, असे जनआरोग्य सोसायटीच्या एका विश्वसनीय अधिकाऱ्याने सांगितले. जनआरोग्य सोसायटीने निश्चित केलेल्या विविध व्याधी असलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील दुर्बल घटकातील ४१ हजार ८४५ रुग्णांना म. फुले आरोग्य योजनेचा लाभ वर्षभरात देण्यात आला. या रुग्णांमध्ये नऊ हजार ८९० रुग्ण करोनाचे आहेत. ३१ हजार ९४५ इतर व्याधी असलेल्या रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला, अशी माहिती महात्मा फुले जन आरोग्य सोसायटीचे ठाणे जिल्हा समन्वयक डॉ. वैभव गायकवाड यांनी दिली. जिल्ह्य़ातील २८ करोना केंद्र आणि ४३ सामान्य रुग्णालयांच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे.

‘कडोंमपा’ अव्वल

कल्याण डोंबिवली पालिकेच्या सहा करोना रुग्णालयांमध्ये सप्टेंबर २०२० ते एप्रिल अखेपर्यंत उपचार घेतलेले पाच हजार १३८ रुग्णांपैकी चार हजार २४३ करोना रुग्ण जनआरोग्य योजनेसाठी पात्र ठरले. या रुग्णांचा सर्व वैद्यकीय खर्च पालिकेने केला. या रुग्ण सेवेच्या बदल्यात पालिकेला जनआरोग्य योजनेतून एप्रिल अखेपर्यंत दोन कोटी १२ लाख ४१ हजार रुपये मिळाले आहेत. ही योजना कडोंमपामध्ये प्रभावीपणे राबविण्यात पालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. आठ कोटी ५० लाखापर्यंत दाव्यांचे लक्ष्य पालिकेने निर्धारित केले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील पालिका नियंत्रित करोना रुग्णालयांमधून उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांचे प्रस्ताव म. फुले जनआरोग्य योजना सोसायटीच्या ठाणे विभागाकडे आल्यानंतर त्यांची छाननी केली जाते. उपलब्ध कागदपत्रांमधून पात्र लाभार्थी निश्चित केले जातात. डोंबिवलीचा रुग्ण नवी मुंबई किंवा ठाणे, मुंबईत, मुंबई, ठाण्याचा डोंबिवली, कल्याणमध्ये उपचार घेत असतो. ही आव्हानात्मक जुळवाजुळव करून लाभार्थीचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य स्तरावर पाठविले जातात. हे प्रस्ताव लवकर मंजूर व्हावेत यासाठी पाठपुरावा केला जातो. त्या पालिकांना रुग्ण संख्या आणि उपचाराप्रमाणे निधी मिळतो.

– डॉ. वैभव गायकवाड, जिल्हा समन्वयक अधिकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजना सोसायटी, ठाणे जिल्हा

पालिका नियंत्रित सहा करोना रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती तात्काळ जनआरोग्य सोसायटीला मिळेल अशी स्वतंत्र व्यवस्था कल्याण डोंबिवली पालिकेने उभारली. या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार मिळतील याकडे लक्ष दिले. आरोग्य मित्र, जनआरोग्य सोसायटीचे चांगले सहकार्य मिळाले. वर्षभरात चार हजाराहून अधिक करोना रुग्णांवर पालिकेने जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले.

– सत्यवान उबाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, कडोंमपा

  • जनआरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी रुग्ण १० ते १४ दिवस रुग्णालयात दाखल असणे आवश्यक.
  •  रुग्णाचे करोनाने बाधित होण्याचा संसर्ग पाहून २० ते ४० हजार रुपये, ८० हजार रुपये आणि एक लाख २५ हजार अशा टप्प्यात रुग्णावर उपचार केले जातात.
  •  वैद्यकीय कागदपत्रांची छाननी करून जनआरोग्य सोसायटी लाभार्थी रुग्णाप्रमाणे पालिकेच्या तिजोरीत निधी जमा करते.