ठाणे : जिल्ह्य़ात करोनाचा प्रसार वेगाने वाढत असताना आता राजकीय पुढारीही करोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. भिवंडीचे खासदार कपिल पाटील, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर आणि उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांना करोनाची लागण झाली आहे. यातील दोन आमदार हे सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून खासदार कपिल पाटील यांना करोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते घरातच विलगीकरणात आहेत.

भिवंडीचे खासदार कपिल पाटील हे मुंबई-नाशिक महामार्गावरील हायवे-दिवे येथे पत्नी, मुलगा आणि तीन पुतणे यांच्यासह वास्तव्यास आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची करोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये खासदार कपिल पाटील यांच्यासह मुलगा, एक पुतण्या आणि तीन सुना अशा एकूण सात जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वावर उपचार सुरू असून खासदार कपिल पाटील यांना सौम्य लक्षणे असल्याने ते साध्य घरात विलगीकरणात आहेत. उल्हासनरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांना गेल्या आठवडय़ात करोनाची लागण झाली, तर कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनाही सहा दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली आहे. या दोन्ही आमदारांची प्रकृती सध्या स्थिर असून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.