महापौरांकडून प्रशासनाची खरडपट्टी, आयुक्तांचा ठेकेदारांना कारवाईचा इशारा

ठाणे : ठाणे शहरातील रस्ते, उड्डाणपूल, महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांबाबत प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागताच ठाण्यातील लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाचे त्याकडे लक्ष गेले आहे. ‘करोनाने त्रासलेल्या नागरिकांचा प्रवास सुसह्य़ व्हावा, यासाठी महापालिका बांधील नाही का’ अशा शब्दांत महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी पालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली, तर महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी शहरातील रस्त्यांची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवण्याचे व चुकार ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

ठाणे शहरातील महत्त्वाचे रस्ते तसेच उड्डाणपुलांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यापैकी काही रस्ते एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या यंत्रणांच्या अखत्यारीत असून पालिकेकडून पाठपुरावा करूनदेखील त्यांनी डागडुजी केली नाही. या मुद्दय़ावरून महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ‘शहरातील काही रस्ते अन्य यंत्रणांच्या ताब्यात असले तरी तेथील खड्डे बुजविण्याची कामेही यापूर्वी महापालिकेने केली आहेत. करोनाने आधीच त्रासलेल्या नागरिकांचा प्रवास सुसह्य़ व्हावा यासाठी महापालिका बांधील नाही का,’ अशा शब्दांत महापौरांनी जाब विचारला. गणेशोत्सवापूर्वी खड्डय़ांची दुरुस्ती झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी म्हस्के यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच खड्डे बुजवण्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी शहराचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी दालमिल चौक येथील रस्त्यांची पाहणी करून एका बाजूच्या राहिलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. हे काम आजच सुरू झाले नाही तर संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. त्यानंतर तीन हात नाका, कशीश पार्क आणि तीन हात नाका ते लुईसवाडी येथील सेवारस्त्याची पाहाणी करून तेथील खड्डे तातडीने भरण्याचे आदेश दिले. तीन हात नाका उड्डाणपुलावरील खड्डय़ांची पाहणी करून बुजविण्यासंदर्भात एमएमआरडीए अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.

खड्डय़ांवरून राजकारण

करोनापाठोपाठ आता शहरातील खड्डय़ांच्या मुद्दय़ावरून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न विरोधकांनी सुरू केल्याचे चित्र आहे. दिवा परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले असून यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या मुद्दय़ावरून भाजपच्या शीळ विभागातील महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील यांनी ‘खड्डेमुक्त रस्ता दाखवा आणि ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जिंका’ अशी जाहिरात केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसकडून आज, गुरुवारी शहरात एकाच वेळी प्रभागस्तरावर ‘खड्डे भरो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

‘पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डय़ांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी एक बैठक घेऊन त्यामध्ये खड्डे बुजविण्याचे आदेश दिले होते. वेळोवेळी संबंधितांशी दूरध्वनीवरून चर्चा करून त्यांना तशा सूचना दिल्या होत्या. तरीही खड्डे बुजविण्यात आले नाहीत. शहरातील उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम महापालिकेच्या अखत्यारीत येत नसले तरी संबंधित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करुन हे काम करून घ्यावे.’

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे