बस सुरू ठेवण्यास परवानगी; अत्यावश्यक सेवा, खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना दिलासा

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंगळवारी ठाणे महापालिकेने टाळेबंदीचे आदेश काढल्यानंतर रात्री ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मनाई आदेश काढले आहेत. या आदेशात राज्य परिवहन महामंडळ तसेच स्थानिक परिवहन उपक्रमाच्या बस ३० जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या बसमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नोकरदार वर्गाला सार्वजनिक वाहतुकीचा मार्ग खुला असणार आहे.

खासगी वाहनांना दुचाकीवर केवळ चालकाला आणि कार, रिक्षामध्ये चालकासह तिघांनाच परवानगी असेल. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांनाही ठाण्यात प्रवेश दिला जाणार आहे. हे आदेश ३१ जुलैपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने  ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी १ ते ३१ जुलैपर्यंत शहरात मनाई आदेश काढले. यामध्ये ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सार्वजनिक वाहने सुरू राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

या सार्वजनिक वाहनांमध्ये अत्यावश्यक आणि खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. तसेच खासगी वाहनाने कंपनीत जाणाऱ्यांना त्यांच्या स्वत:च्या वाहनाने जाता येईल.

यांनाही परवानगी

’ अंत्यविधी आणि विवाह समारंभास ५० व्यक्तींपुरती मर्यादा असेल.

’ ई-कॉमर्सच्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि साहित्याची वाहतूक.

’ अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा.

’ पशुवैद्यकीय रुग्णालये आणि पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक दुकाने.

’ डी-मार्ट, बीगबाजार, स्टार बाजार, सुपर मार्केटमध्ये किराणा वस्तूंची विक्री.

’ मालवाहतूक .

’ परवानगीप्राप्त शासकीय आणि खासगी बांधकामे.

’ वाहने देखभाल दुरुस्तीचे आस्थापना.

’ वर्तमानपत्रे छपाई आणि वितरण.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी रात्री मनाई आदेश काढण्यात आलेला आहे. आम्ही सार्वजनिक वाहनांमध्ये अत्यावश्यक सेवेतील आणि खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना परवनागी दिली आहे. मात्र, खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांपैकी मनुष्यबळाच्या केवळ १० टक्केच कर्मचाऱ्यांना परवानगी असेल. कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना बसगाडय़ांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे.

– डॉ. सुरेश मेकला, सहआयुक्त, ठाणे शहर पोलीस.