घरात स्फोटके सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला. राऊतची अटक आणि पाठोपाठ उलगडत जाणाऱ्या घटना यांमुळे वसईसह राज्याचे वातावरण संवेदनशील आणि तणावग्रस्त बनले आहे. मोर्चात ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या. खरे म्हणजे आरोपीचे समर्थन करणे आणि त्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे याचा जनतेने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.

राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांला अटक केली. त्याच्या घरात स्फोटके आणि बॉम्ब सापडल्याचे एटीएसने सांगितले. राऊतच्या अटकेनंतर राज्यभरात धाडसत्र सुरू झाले आणि एकामागोमाग एक अटकसत्राला सुरुवात झाली. याच कारवाईतून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर प्रत्यक्ष गोळा झाडल्याचा आरोप असलेल्या सचिन अंदुरे यालाही अटक करण्यात आली. पाच वर्षांनी दाभोलकरांच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता आले ते वैभव राऊतच्या अटकेनंतर. ही कारवाई सुरू आहे आणि कदाचित अनेक प्रकरणांचा उलगडा होईल. पण वैभव राऊतच्या अटकेने वसईतील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारण वैभव राऊत हा निर्दोष असून त्याला गोवण्यात आले आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. तेवढय़ावरच हे ठीक होतं. पण त्याच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला आणि या मनोवृत्तीने नवीन प्रश्न निर्माण केले आहे. याचे दूरगामी पडसाद समाजावर पडणार आहेत, त्यामुळे त्यावर विचारमंथन आवश्यक ठरते.

वैभव राऊतला समर्थन का मिळते याचा शोध घेण्यासाठी वसईची सामाजिक पाश्र्वभूमी पाहावी लागेल. वैभव हा वसईच्या सोपारा गावातील भंडार आळीत राहणारा स्थानिक. भंडारी समाजाचा. वसईत जे मूळ रहिवासी आहेत, त्यात ख्रिस्ती, सामवेदी, आगरी, कोळी यांप्रमाणेच भंडारी समाजाचाही समावेश होतो. हा समाज अत्यंत सधन, सुशिक्षित आहे. वसईपासून मुंबई, पालघपर्यंत हा समाज पसरलेला आहे. वैभव गेल्या काही वर्षांपासून गोरक्षणाचे काम करत आहे. २०१४ मध्ये त्याच्यावर गुन्हाही दाखल होता. त्या वेळीही बंद पाळण्यात आला होता. भंडार आळी हा परिसर मुस्लीमबहुल सोपारा गावाला लागून आहे. सोपारा गावात बेकायदा गाईंच्या कत्तली चालतात म्हणून वैभव पोलिसांत तक्रारी करायचा. ईदच्या काळात वैभवला प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून त्याला गाव सोडण्यास सांगितले जायचे, असे तेथील स्थानिक सांगतात. गेल्या काही वर्षांपासून तो अलिप्त झाला होता. फेसबुक, ट्विटरपासून त्याने फारकत घेतली होती. त्यामुळे पोलीस घरात धडकले आणि घरातून थेट बॉम्ब जप्त केल्याने लोकांना धक्का बसला.

स्थानिकांचा पोलिसांवर प्रचंड रोष होता. त्यात वैभवच्या अटकेनंतर त्यांचा रोष बळावला. हा रोष हिंदुत्ववादी संघटनांनी पकडला आणि मोर्चाची हाक देण्यात आली. वैभवच्या समर्थनार्थ भंडारी समाज एकत्र आला. केवळ आपल्या समाजाचा आहे म्हणून लोक एकत्र आले. त्याच्यावर काय आरोप आहेत आणि त्याची साखळी कुठे कुठे आहे ते लोकांना जाणून घ्यावेसे वाटत नाही. या मोर्चात महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. मोर्चामुळे पोलिसांची कसोटी लागली. आजही तणाव कायम आहे.

वैभवचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ पूर्वीपासून तो निर्दोष असल्याचा दावा करत होते. त्यांनी ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला. पण सूडबुद्धीने कारवाई करणार कोण? केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. हे सरकार खुलेआम हिंदुत्ववादाचा पुरस्कार करते. मग कारवाई करणार कोण? दहशतवादविरोधी पथकाने जी कारवाई केली, त्याचे पडसाद उमटणार याची त्यांना कल्पना होती. त्यामुळे गृहखात्याला, सरकारला अंधारात ठेवून ही कारवाई केली असेल, असे होणार नाही. वैभवच्या घरात बॉम्ब सापडले तर ते एटीएसने का दाखवले नाही, असा सवाल समर्थकांनी केला आहे. मात्र एटीएसची कारवाई मुळात अत्यंत गोपनीय असते. ती अद्याप पूर्ण झालेली नाही हे लक्षात घ्यायला हवे. सरकार भाजपचे आहे मग भाजपने वैभव राऊतला गोवले का? त्यामुळे लोकांना अशा संवेदनशील घटनांच्यावेळी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. या घटनांमुळे परिस्थिती अत्यंत तणावाची बनलेली आहे. समाजकंटक त्याचा फायदा उचलू शकतात. ठिणगी जरी पेटली तर वणवा पेटेल. पोलीस यंत्रणा काम करतेय. न्यायव्यवस्था योग्य न्याय देईल. वसईकर जनतेने अशा वेळी फक्त संयम बाळगणे गरजेचे आहे.

suhas.birhade@expressindia.com

 @suhas_news