जीवनावश्यक वस्तूंचा साठा करणाऱ्यांविरुद्ध पोलीस आणि शिधावाटप अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत सुमारे १५ कोटी नऊ लाख रुपये किमतीच्या विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यांचा साठा जप्त करण्यात आला.
ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि शिधावाटप अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मुंब्रा-पनवेल रस्त्यावरील दहिसर-मोरी येथील तीन गोदामांमध्ये बेकायदा साठा करून ठेवलेल्या मालाची झडती घेतली. त्यात एक हजार ६९२ मेट्रिक टन इतकी मसूरडाळ, तूरडाळ आणि कडधान्ये आढळून आली. याप्रकरणी मेसर्स सरस्वती पल्सेसचे पवन अगरवाल, धवल फुडस् प्रा. लि.चे अमित जाधव, आशीर्वाद अ‍ॅग्रोचे रोहित खिलवाणी आदी व्यापाऱ्यांविरुद्ध शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.