निसर्गाच्या सान्निध्यात, शहराच्या गजबजाटापासून थोडे दूर शांततापूर्ण वातावरण असलेल्या रामचंद्रनगर भागात नागरिक राहण्यास आले. डोंबिवली शहराचा कायापालट होत होता. बैठी घरे, चाळींची जागा टोलेजंग इमारती घेत होत्या. गांधीनगर, रामचंद्रनगर परिसरही त्यास अपवाद नव्हता. शहरापासून थोडय़ा दूर अंतरावर असले तरी येथेही १९८७-८८ मध्ये इमारती उभ्या राहण्यास सुरुवात झाली. याच भागातील सर्वात जुनी सोसायटी म्हणून ओळख असलेली वसाहत म्हणजे पुनीत दर्शन सोसायटी. निसर्गाच्या सान्निध्यात ही सोसायटी आज उभी असली तरी गेली २५ वर्षे येथील रहिवासी वायुप्रदूषणाचा त्रास भोगत आहेत. या समस्येतून सुटका होण्यासाठी ते वारंवार लढा देत असले तरी त्यांचे प्रयत्न अद्याप प्रशासनापुढे तोकडेच पडलेले दिसतात.

पुनीत दर्शन सोसायटी रामचंद्रनगर, डोंबिवली (पू.)

डोंबिवली पूर्वेतील स्टेशनपासून अध्र्या तासाच्या अंतरावर गांधीनगर, रामचंद्रनगर, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी परिसर येतो. २५-३० वर्षांपूर्वी एखाद्या खेडेगावासारखा हा परिसर होता. बैठी घरे आणि चाळींचा त्यात अधिक प्रमाणात समावेश होता. शहरातून विभागात येण्यासाठी पायवाटेएवढा निमुळता रस्ता होता. शेतातून मार्ग काढीत, मातीचा रस्ता तुडवित घर गाठावे लागत होते. संध्याकाळी अंधार पडायच्या आत सर्वजण घरी परतत असत. ती मज्जा काही औरच असायची. १९८९-९० मध्ये रामचंद्रनगर येथे पुनीत दर्शन सोसायटी उभी राहिली. या सोसायटीमध्ये ए व बी अशा दोन विंग होत्या. दोन मजली इमारतीत एकूण २० सदनिका होत्या. पुढे १९९१ मध्ये सोसायटीच्या मोकळ्या जागेत बिल्डरने आणखी एक सी विंग उभी केली. या एका विंगमध्ये २० सदनिका आहेत. अशा रीतीने मिळून ४० सदनिका व १२ गाळ्यांची ही सोसायटी उभी राहिली. मुंबईतून स्थलांतरित झालेल्या काहींनी येथे घरे घेतली असली तरी बहुतेक जण स्थानिक चाळकरीच आहेत. त्या वेळी तीन ते चार लाख रुपयांमध्ये येथे घर मिळाले. अर्थातच ही कनिष्ठ मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. बहुभाषिक नागरिक या सोसायटीमध्ये गुण्यागोविंदाने राहत असल्याचे जुने रहिवासी अविनाश बानकर यांनी सांगितले.
रामचंद्रनगर परिसरात उभी राहिलेली ही सर्वात जुनी सोसायटी आहे. आणखीही काही सोसायटी होत्या; परंतु त्या दूर अंतरावर होत्या. अवघ्या दोन ते तीन सोसायटी त्या काळी परिसरात उभारल्या होत्या. सोसायटीपर्यंत येण्यासाठी खडकाळ पायवाट होती. गांधीनगरचा नाला येथून फार पूर्वीपासून वाहत आहे. या नाल्यावरून येण्यासाठी अरुंद पूल होता. शेतातून पायवाट तुडवीत येथे येणे फार रम्य वाटत असे, अशी आठवण एका रहिवाशाने सांगितली.
लोकांमध्येही जिव्हाळ्याचे संबंध असल्याने विविध भाषिक लोक असले तरी एकोप्याने गुण्यागोविंदाने नांदत होते. आरोग्याची काही समस्या उद्भवली तर जवळच डॉ. आनंद हर्डीकर यांचा दवाखाना होता, आजही आहे. मुलांसाठी शाळाही जवळपास असल्याने तसे फार समस्यांची जाणीव होत नव्हती.
एकच समस्या मात्र येथील नागरिकांना गेल्या २५ वर्षांपासून भेडसावत आहे, ती म्हणजे वायुप्रदूषण. गांधीनगरच्या उघडय़ा नाल्यात कंपन्यातील रसायनयुक्त द्रव्ये सोडली जात असल्याने रात्रीच्या वेळी परिसरात उग्र वास जाणवतो. निवासी विभागात औद्योगिक कंपन्यांची संख्या वाढली आणि नागरिकांच्या त्रासात आणखीनच वाढ झाली. दररोज रात्री येथील कंपन्या या नाल्यात रसायनयुक्त द्रव्ये सोडतात. त्यांच्या उग्र दर्पाने रात्रीच्या वेळेस श्वासोच्छवास घेणेही कढीण होते. या परिसरातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना ही समस्या जास्त भेडसावते. नुकत्याच सोसायटीमधील एका व्यक्तीला श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉ. हर्डीकर यांच्यासारखे चांगले डॉक्टर या परिसरात असल्याने रात्री-अपरात्री अशा काही समस्या उद्भवल्यास ते त्वरित मदतीस येतात. अन्यथा इतर ठिकाणी रात्री रुग्णांना घेतले जात नाही. दमा, हृदयरोग असणाऱ्या व्यक्ती या वासाने अधिक त्रस्त असल्याने हा नाला बंदिस्त करण्यात आला तर खूप बरे होईल, असे येथील रहिवासी रवींद्र जैतापकर यांनी सांगितले.
रामचंद्रनगर नाल्याच्या बाजूलाच स्वामी विवेकानंद विद्यामंदिरची शाळा आहे. या शाळेतील मुलांनाही या नाल्याच्या दरुगधीचा दररोज सामना करावा लागतो. नाल्यातील पाण्याची पाहणी केली तर त्याचा रंग दररोज बदललेला असतो. त्याचा अर्थ येथे रासायनिक पाणी सोडले जात आहे; परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा लोकप्रतिनिधी त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत.
मोटारसायकलस्वारांचा उच्छाद
परिसर तसा शांत असला तरी येथे रात्री अकरानंतर मात्र बाइकस्वारांनी उच्छाद मांडलेला असतो. महाविद्यालयीन तरुणांसोबतच इतर तरुणही येथे रात्रीच्या वेळेस स्टंटबाजी करताना दिसतात. यामुळे दिवसा वाहनांचा आवाज आणि रात्री बाइकस्वारांचा आवाज यामुळे नागरिकांना शांत झोपही मिळत नाही. अनेकदा याविषयी पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या; परंतु हा त्रास काही कमी झालेला नाही. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परिसरात एका पोलीस चौकीची आवश्यकता आहे; परंतु ही मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. सोनसाखळी चोरी, घरफोडीच्या घटना येथे घडतात. पोलिसांनी जर सिव्हिल ड्रेसमध्ये परिसरात गस्त घातली तर नक्कीच या घटना कमी होतील; परंतु त्यांना गांभीर्य नसल्याचे जाणवते अशा तक्रारी येथील रहिवासी करतात.
या परिसरात रस्तेही अरुंद असल्याने वाहतुकीची समस्या कायम भेडसावते. गांधीनगर नाल्यावरील पूल हा सुरुवातीला खूपच अरुंद होता, केवळ एक वाहन जाऊ शकेल अशी परिस्थिती होती. दहा-बारा वर्षांपूर्वी या नाल्यावरील पुलाचे काम करण्यात आल्याने किमान येथील वाहतूक सुरळीत झाली आहे. स्टेशन गाठण्यासाठी नागरिकांना स्वत:चे वाहन, रिक्षा किंवा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन बसेसचा पर्याय उपलब्ध आहे; परंतु परिवहनची बस अनेकदा वेळेवर नसते आणि मध्येच बंदही पडते. त्यामुळे नागरिक शक्यतो रिक्षानेच प्रवास करतात. पाणीपुरवठय़ाची सुरुवातीला खूप मोठी समस्या येथे होती; परंतु महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच कल्याण-डोंबिवली महानगर पालिका या दोघांकडूनही पाइपलाइन घेण्यात आली आहे. त्यामुळे आता पाण्याची कमतरता जाणवत नाही. सध्या सगळीकडेच पाणीकपात आहे. आठवडय़ातील दोन दिवस पाणी येत नाही; परंतु सर्वत्रच ही समस्या असल्याने त्याचे ऐवढे काही नाही. मुलांना खेळण्यासाठी बगिचे, मैदाने जवळपास असल्याने मुले तेथे जाऊनच मैदानी खेळ खेळण्यास प्राधान्य देतात. सोसायटीच्या आवारात तशी कमी जागा असल्याने छोटेखानी खेळ काही मुले येथे खेळतात. वाहन पार्किंगची समस्या आता जाणवू लागली आहे. २५ वर्षांपूर्वी वाहने खूप कमी नागरिकांकडे असल्याने बिल्िंडग उभारताना बिल्डर त्याचा विचार करत नव्हते; परंतु काळ बदलला आणि वाहनांची संख्या वाढू लागली. आज प्रत्येक घरात एक तरी वाहन आढळतेच. सोसायटीच्या आवारात कमी जागा असल्याने सर्वानाच सोसायटीच्या आत वाहन पार्किंग करता येत नाही. काही जण रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात.
सोसायटीच्या कार्यकारिणीत राजाराम जैतापकर, रमेश कदम, राजेश भोगदे यांसारखी मंडळी असून त्यांच्या सहकार्याने सोसायटीत अनेक नवे नवे उपक्रम राबविण्याचा मानस आहे. सोसायटीमध्ये विविध भाषिक वर्ग असल्याने सर्व सण उत्सव येथे साजरे होतात. गणतंत्र दिन, स्वातंत्र्य दिन, होळी, धुलिवंदन, दिवाळी, सोसायटीची सत्यनारायणाची पूजा आदी काळात नागरिक एकत्र जमतात. वर्षांला ८० हजार ते एक लाखाच्या आसपास कर भरला जातो. बांधकाम जुने असल्याने अद्याप तरी दुरुस्तीचा जास्त खर्च निघालेला नाही. सोसायटीच्या गच्चीवर पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. शिवाय भविष्यात आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्याची इच्छा आहे. शिवाय सोलर यंत्रणा बसविण्याचाही विचार असून यासाठी निधीची कमतरता जाणवत आहे. या निधीसाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले तर नक्कीच हा प्रकल्प लवकर पूर्णत्वास येईल. माजी नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांनी सोसायटीला अनेकदा सहकार्य केले आहे. प्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी सोसायटीच्या आवारात झाडे लावली आहेत. आज या वृक्षांचा उपयोग सावलीसाठीही होतो.