निलंबनाच्या आदेशानंतरही गोविंद राठोड यांचा विरारमध्ये शाही निरोप समारंभ
निलंबनाचे आदेश मिळाल्यानंतरही अतिरिक्त आयुक्त गोविंद राठोड यांचा शाही निरोप समारंभाचा कार्यक्रम करण्यात आला. विरारच्या याझू पार्कमध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या या कार्यक्रमात निलंबनाची बाब उपस्थितांपासून दडवून ठेवण्यात आली होती. कार्यक्रमानंतर खास व्यक्तींसाठी कॉकटेल आणि जेवणाचा शाही बेत आखण्यात आला होता.
अतिरिक्त आयुक्त गोविंद राठोड सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, आजी माजी नगरसवेक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते यांना आमंत्रित करण्यात आले होते. परंतु सोमवारी अचानक निलंबनाचे आदेश हातात पडले. निवृत्तीच्या दिवशीच निलंबित होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती. कार्यक्रम करावा की नाही याबाबत द्विधा स्थिती होती. परंतु सर्वाना अंधारात ठेवून कार्यक्रम करण्याचा निर्णय घेण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता होणारा कार्यक्रम सात वाजता सुरू झाला. महापौर प्रवीणा ठाकूर आणि आयुक्त सतीश लोखंडे उपस्थित राहिले नाहीत. निलंबित झाल्याचे कुठलेही पडसाद कार्यक्रमावर उमटू देण्यात आले नाहीत. राठोड यांनी सत्कार आणि मानपत्र स्वीकारले. अगदी मोजक्या लोकांनाच राठोड निलंबित झाल्याचे माहीत होते. ही बाब लपवून ठेवली होती, असे एका नगरसेवकाने सांगितले. कार्यक्रमानंतर खास लोकांसाठी कॉकटेल आणि शाही भोजनाचा बेत ठेवला होता. निलंबित अधिकाऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची नामुष्की उलट आमच्यावर ओढवली अशी संतप्त प्रतिक्रिया एका नगरसेवकाने दिली.