आंघोळ, पिण्यासाठी विहिरींमधील पाण्याचा वापराचा प्रयत्न
पाटबंधारे विभागाने लागू केलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील रहिवाशांना आतापासूनच आठवडय़ाचे दोन ते तीन दिवस निर्जळी काढावे लागत आहेत. पुढील काही महिन्यांत येऊ घातलेल्या पाणी संकटावर उपाय शोधण्यासाठी शहरातील सुमारे ५५५ विहिरींचे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देता येईल का, याची चाचपणी पाणीपुरवठा विभागाने सुरू केली आहे. या विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या पर्यावरण विभागाने या विहिरींमधील पाण्याचे नमुने तपासले असून ठाणे शहर, वागळे इस्टेट तसेच वर्तकनगर परिसरातील विहिरींमधील पाणी पिण्याजोगे करता येऊ शकते या निष्कर्षांप्रत पाणीपुरवठा विभाग आला आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येक विहिरीवर पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवून नजीकच्या वस्तीला ते पिण्यासाठी तसेच आंघोळीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यंदा पावसाने ओढ घेतली असली तरी या विहिरींमधील पाण्याची पातळी अजूनही चांगली असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे.
जसा उन्हाळा वाढत जाईल तशी पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर रूप धारण करेल अशी भीती पाटबंधारे विभागास आहे. जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरेल अशा पद्धतीने नियोजन केले जात असले तरी विविध प्राधिकरणांकडून होत असलेल्या पाण्याच्या उपशामुळे परिस्थिती आताच हाताबाहेर जाते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. हे लक्षात घेऊन शहरातील पारंपरिक पाणीस्रोताचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरू केला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील सुमारे ३३९ विहिरींची तातडीने सफाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र खडताळे यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ शी बोलताना दिली.
शहरात एकूण ५५५ विहिरी आहेत. त्यापैकी ३३९ विहिरी वापरात असून उर्वरित २३२ विहिरींच्या सफाईचे कामही सुरू करण्यात आले आहे. हे करत असताना पर्यावरण विभागाने केलेल्या तपासणीनुसार ठाणे शहर, वागळे इस्टेट परिसरातील १५० पेक्षा अधिक विहिरींचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे तपासणीत आढळले आहे. त्यामुळे या सर्व विहिरींवर जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून तेथील पाणी पिण्यासाठी तसेच आंघोळीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे, असे खडताळे यांनी स्पष्ट केले. ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनापुढे ठेवला होता. या प्रस्तावानुसार चाचपणी केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांना दररोज सुमारे ४५० एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता भासते. पालिका स्टेम, भातसा धरणावरील स्वत:ची पाणीपुरवठा योजना, एमआयडीसी तसेच मुंबई महापालिकेकडून हे पाणी विकत घेते. कळवा तसेच मुंब्रा परिसराला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाण्याचा पुरवठा केला जातो.
’ यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उल्हास नदीत पाणीसाठा कमी आहे.
’ पाटबंधारे विभागाने गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्य़ातील प्रमुख शहरांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठय़ात ३० टक्क्य़ांची कपात लागू केली आहे. त्यामुळे ठाणे शहरात आठवडय़ाला ४८ ते ६० तासांची पाणी कपात लागू झाली आहे.