कोणतीही संघटना माघार घेत नसल्याने स्पर्धा रद्द होण्याची भीती

ठाणे महापालिकेकडून आयोजित केल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग ‘महापौर चषक’ या स्पर्धेच्या आयोजनाचा मान मिळविण्यासाठी दोन संघटनांनी आग्रह धरला असून त्यापैकी एकही संघटना माघार घेण्यास तयार नसल्यामुळे ही स्पर्धाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वादामुळे स्पर्धाच रद्द करण्याचा विचार प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सुरू केला असून, तसे झाल्यास स्पर्धकांना मात्र स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिकेकडून दरवर्षी डिसेंबरमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचाही समावेश असतो. १९८५ ते १९८९ या काळात ही स्पर्धा झाली होती. मात्र त्यानंतर काही कारणांस्तव ती रद्द करण्यात आली. २०१६ पासून ही स्पर्धा पुन्हा सुरू झाली, मात्र यंदा दोन संघटनांतील वादामुळे ही स्पर्धा पुन्हा अडचणी आली आहे.

आजवर ही स्पर्धा ‘ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोशिएशन’च्या मदतीने घेण्यात आली आहे. यंदाही याच संघटनेने स्पर्धेच्या आयोजनासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. याच संघटनेत फूट पडून नव्याने नोंदणी झालेल्या ‘ठाणे अ‍ॅमेच्युअर पॉवरलिफ्टिंग वेल्फेअर असोशिएशन’ या संघटनेनेही महापालिकेकडे पत्रव्यवहार करून यंदाच्या स्पर्धेच्या आयोजनाचा मान देण्याची मागणी केली आहे. दोन्हीपैकी एकही संघटना माघार घेण्यास तयार नाही, त्यामुळे हा तिढा सोडविण्यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या कार्यालयात नुकतीच दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन स्पर्धेचे आयोजन करावे, असा सल्ला देण्यात आला. संघटनांना निर्णय घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत महापौर शिंदे यांनी दिली आहे. बैठकीनंतरही दोन्ही संघटना माघार घेण्यास तयार नसल्याने स्पर्धाच रद्द करण्याचा विचार प्रशासनासह पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

दोन संघटनांमधील वादामुळे स्पर्धकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना एकत्र येऊन स्पर्धेचे आयोजन करण्यास सांगितले आहे. यंदा एका संघटनेला तर पुढच्या वर्षी दुसऱ्या संघटनेला आयोजनाचा मान देण्याचा प्रस्तावही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपुढे ठेवला आहे. त्यासाठी दोन्ही पदाधिकाऱ्यांना काही दिवसांची मुदत देऊन निर्णय घेण्यास सांगितले आहे. दोन्ही संघटना आग्रही राहिल्या तर स्पर्धा रद्द कराव्या लागतील आणि त्यामुळे स्पर्धकांचे नुकसान होईल, अशी माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिली.

दोन्ही संघटना स्पर्धेच्या आयोजनासाठी आग्रही आहेत. वादामुळे स्पर्धा रद्द करावी लागली तर स्पर्धकांचे नुकसान होईल. ते टाळण्यासाठी एक खेळ एक संघटना याबाबत शासनस्तरावर निर्णय होणे गरजेचे आहे.

– मीनल पालांडे, महापालिकेच्या क्रीडा अधिकारी

१९८५ ते १९८९ आणि २०१६ व १७ मध्ये आमच्या संघटनेनेच महापौर चषक स्पर्धा घेतली आहे. संघटना दरवर्षी २० जिल्हास्तरीय स्पर्धा घेते. यंदाही आम्ही स्पर्धेच्या आयोजनासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र नुकतीच नोंदणी झालेल्या संघटनेच्या अर्जामुळे अद्याप निर्णय झालेला नाही.

– मधुकर पाटकर, सचिव, ठाणे जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोशिएशन

दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन आयोजन केले तर स्पर्धेचे नियोजन योग्य रीतीने होऊ शकणार नाही. त्यामुळे यंदा आम्हाला आणि पुढच्या वर्षी दुसऱ्या संघटनेला आयोजनाचा मान देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य करण्यात येईल किंवा स्पर्धाच रद्द करावी लागेल. याबाबत महापालिका निर्णय जाहीर करील.

– संभाजी सूर्यराव, ठाणे अमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग वेल्फेअर असोशिएशन