देशभरात आर्थिक पातळीपासून ते इतर खूप प्रश्न आहेत. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागत आहे. अनेक कार्यालयांतील शेकडो जण बेरोजगार होत आहेत. त्यांच्या घराच्या चुली विझत आहेत. या आजच्या प्रश्नाचे प्रतिबिंब साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यात उमटविले पाहिजे, असे मत आगामी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मंगळवारी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे आणि मुंबई प्रदेश शाखेतर्फे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे ठाण्यातील मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी फ्रान्सिस दिब्रिटो यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

सध्या साहित्यिकांनी वास्तवावर लिहणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात शेतकऱ्याबद्दल कविता लिहिताना बांधावर जाऊन कविता लिहायला हवी. शेतकऱ्याने शेतात पिकवलेल्या पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या डोळ्यातल्या अश्रूविषयी कवितेमध्ये लिहून आपल्या डोळ्यात अश्रू यायला हवे. वास्तवाचे भान कवीला हवे, असे फ्रान्सिस दिब्रिटो या वेळी म्हणाले. देशभरात आर्थिक पातळीवरचे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारांची संख्या वाढत असून अनेक उद्योगधंद्यांना टाळे लागत आहेत. या आजच्या प्रश्नाचे प्रतिबिंब साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यात उमटविले पाहिजे, अशा साहित्याचे प्रदर्शन करावे लागत नाही, त्याचे दर्शन हे समाजाला होत असते, ही बाब त्यांनी नमूद केली.

या कार्यक्रमावेळी डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या ‘खिल्ली’ या तिसऱ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते झाले.