भाईंदरमध्ये तक्रार; तीन विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षांच्या अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांच्या हाती लागल्याचा प्रकार भाईंदर येथील अभिनव महाविद्यालयातील केंद्रात उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाविद्यालयाच्या प्राचार्यानी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ एप्रिलला अर्थशास्त्राचा पेपर होता. मात्र परीक्षा सुरू होण्याआधीच या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे एका विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे प्रश्नपत्रिकेत ज्या क्रमाने प्रश्न विचारले होते त्याच क्रमाने मोबाइलमध्ये उत्तरे दिसून आली. महाविद्यालयाचे प्राध्यापक मयूर दमासिया स्वच्छतागृहात गेले असता त्या ठिकाणी एक विद्यार्थी मोबाइलमध्ये काही तरी वाचताना दिसून आला. शंका आल्याने दमासिया यांनी मोबाइल तपासला असता त्यात प्रश्नांची उत्तरे असल्याचे दिसले. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचीच ही उत्तरे असल्याचे स्पष्ट झाले. याच पद्धतीने आणखी दोन विद्यार्थ्यांनीही त्यांच्या उत्तरपत्रिकेत ही उत्तरे लिहिल्याचे या वेळी उघडकीस आले. अभिनव विद्यालयाचे प्राचार्य केशव परांजपे यांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.