करोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे जिल्ह्यााला एक लाख ६६ हजार लशीचे डोस उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. मात्र, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांचा ओढा वाढत असून अगदी पहाटेपासून नागरिक रांगा लावत आहेत. पहिला डोस ज्या लशीचा घेतला, त्याच लशीचा दुसरा डोस द्यावा लागतो. मात्र, लसीकरण केंद्रांवर कोणती लस उपलब्ध आहे याची माहिती योग्य वेळेत मिळत नाही. यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर हवी असलेली लस उपलब्ध नसल्याचे पाहून अनेकांना लसीकरणाविनाच परतावे लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेची २९ तर १४ खासगी लसीकरण केंद्रे आहेत. यातील पालिकेची काही केंद्रे एक दिवसआड सुरू आहेत. या सर्वच केंद्रांवर आतापर्यंत दोन लाख ८ हजार २७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात लसीचा साठा संपत आल्याने लसीकरण थांबले होते. मात्र, दोनच दिवसांत साठा उपलब्ध झाल्याने मोहीम सुरू झाली आहे.

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालय, पोस्ट कोवीड सेंटर, कळवा रुग्णालय, जितो रुग्णालय, कौसा प्रेक्षागृह, आनंदनगर, कोपरी, ढोकाळी, डॉ. आंबेडकर भवन, सीआर वाडिया, दिवा, हाजुरी, कौसा, किसननगर, लोकमान्यनगर, रोझा गार्डनिया, सह््याद्री, कळवा, चिरागनगर, माजिवाडा, उथळसर, सावरकरनगर या भागातील दवाखाने आणि रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र आहेत. ही सर्वच केंद्रे सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत सुरू असतात. या केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिक पहाटेपासूनच रांगा लावत असून यामुळे केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते.

कल्याण-डोंबिवली शहरात १६ लसीकरण  केंद्रे आहेत. त्याठिकाणी पूर्व नोंदणी करून नागरिक लस घेण्यासाठी येत असतात. ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांच्या कुटुंबातील एक असतो. त्यामुळे या केंद्रांवर गर्दी होताना दिसून येते. भिवंडी शहरात महापालिकेचे एकूण आठ लसीकरण केंद्र आहेत. भिवंडीत लस घेणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह््यातील इतर महापालिकेच्या तुलनेत कमी आहे. गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने काही प्रमाणात केंद्रांवर गर्दी झाली होती.

बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील लसीकरण केंद्रांवर मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करत आहेत. बदलापूर शहरात दररोज चार केंद्रांवर एकूण ३०० ते ३५० लसीचे डोस दिले जातात. त्यासाठी नागरिक भल्या पहाटेपासूनच पालिकेच्या कै. दुबे रुग्णालयाबाहेर गर्दी करत आहेत. एका केंद्रावर केवळ ८० टोकन दिले जात असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागते आहे. सकाळी चार वाजता रांगेत उभे राहिल्यानंतर नऊच्या सुमारास लसीसाठी क्रमांक टोकन दिले जातात. त्यानुसार त्या त्या वेळेवर लसीसाठी जावे लागते. त्यामुळे लस घेण्यासाठी सुमारे ७ ते ८ तास खर्ची घालण्याची वेळ आली आहे.

उल्हासनगर शहरात आठ ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. दररोज ७०० ते ७५० लसीचे डोस दिले जातात. आठ केंद्र असले तरी शासकीय केंद्र अवघे दोन असल्याने नागरिक या दोन केंद्रांवरच गर्दी करतात. यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शाळा क्रमांक २८ या केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. ठाणे ग्रामीणमध्ये ४१ लसीकरण केंद्र असून त्यामध्ये ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, १० ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ३ उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील या केंद्रांवर दररोज सरासरी ४ ते ५ हजार नागरिकांना लस देण्यात येत आहे.

लसीचे वाटप

३०,०००

ठाणे

२४,०००

कल्याण-डोंबिवली

३८,०००

नवी मुंबई</p>

२,५००

उल्हासनगर

२८,०००

मिराभाईंदर

५,५००

भिवंडी

३८,०००

ठाणे ग्रामीण

१,६६,०००

एकूण

 

लसीचे वाटप

शहर            लस

ठाणे    ३०,०००

कल्याण-डोंबिवली २४,०००

नवीमुंबई ३८,०००

उल्हासनगर २,५००

मिराभाईंदर  २८,०००

भिवंडी  ५,५००

ठाणे ग्रामीण ३८,०००

एकूण   १,६६,०००