ढगाळ वातावरण, शेतात पाणी साचल्याने शेतकरी चिंतातूर

विरार : ऑक्टोबर व नोव्हेबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसल्याने त्याचा फटका रब्बी हंगामालाही बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे पेरणीसाठी सुलभ वातावरण नसल्याने आणि जमिनीत पाणी साचून राहिल्याने रब्बी पेरण्याही लांबणीवर पडल्या आहेत. दररोजच्या वातावरणात होणाऱ्या बदलामुळे रब्बीच्या पिकांविषयी शेतकरी निर्णय घेऊ  शकत नाही. यामुळे हंगाम सुरू होऊनही शेतीच्या कामाला सुरुवात झालेली नाही.

या वर्षी पावसाने आधीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस झाल्याने खरिपाच्या हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे आता रब्बी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. अजूनही वसई-विरारमध्ये ढगाळ वातावरणनिर्मिती होत असल्याने जमिनीत ओलावा आहे. जे रब्बीसाठी घातक असून काही ठिकाणी शेतांमध्ये आजही पाणी साचून असल्याने तेथे सध्या पेरणी करणे शक्य नाही.

वसईत घेण्यात येणाऱ्या रब्बी पिकांमध्ये चणा, तूर, वाल, पावटा, उडीद, राई, मूग, तीळ, आदी कठवळ पिके घेण्यात येतात. सदर, पिकांसाठी खरिपानंतर मोकळी झालेली व साधारण ओलावा असलेली जमीन नांगरताना जास्त ढेकळे निर्माण हवीत अशा स्थितीतील जमिनीत रब्बी पेरली जाते. मात्र, आजच्या घडीला बहुतांश जमिनींची स्थिती पाहता मोठा ओल असलेल्या जमिनीचा वाफसा व्हायला अजूनही पंधरवडा ते महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे आणि तरीही अशात जर पेरण्या केल्या तर पुढे लांबलेल्या हंगामामुळे रब्बी नुकसानीत तर जाणार नाही ना, अशी विचारणा शेतकरी करत आहेत. त्यामुळे रब्बी पेरण्यांविषयी शेतकरी संभ्रमात पडला आहे.

वसई तालुक्यात १११७.४० हेक्टर क्षेत्र रब्बी लागवडीचे आहे. मागच्या वर्षी पावसाने वेळेआधीच हात आखडता घेतल्याने ८५७ हेक्टर क्षेत्रावर रब्बी लागवड झाली होती. मात्र चालू वर्षी पुढे जर योग्य वातावरण निर्माण झाले तर लागवडीचे क्षेत्र मिळालेल्या ओलाव्यामुळे हजार हेक्टरपेक्षा जास्त वाढेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावर्षी रब्बीसाठी वसई कृषी विभागाने शंभर टक्के  अनुदानावर ३५ क्विंटल बियाण्याची मागणी शासनाकडे केली असून २० क्विंटल पन्नास टक्के अनुदान मिळणाऱ्या बियाण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जमिनीच्या ओलाव्याची तपासणी करून कृषी विभागाकडे बियाण्याची मागणी करावी व पेरण्या कराव्यात, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पिके आलीच तर वांझ होण्याची स्थिती

कर्ज काढून खरिपात जे नुकसान सोसावे लागले आहे त्याची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असताना नगदी पीक असलेल्या रब्बीसाठी ही कर्ज काढावे लागणार आहे. परंतु आजच्या वातावरणाची स्थिती पाहता हे रब्बीसाठी योग्य नाही. यामुळे  मर, मूळकूज पिकांना होऊ  शकते. तसेच, जर पिके आलीच तर वांझ होण्याची स्थिती येऊ शकते, म्हणून यंदा रब्बी हंगामात पेरण्या केल्या नाहीत अशी माहिती महेश किणी या स्थानिक शेतकऱ्याने दिली आहे.

जसा पावसाळा लांबला तसा हिवाळाही लांबणीवर जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी शेतकऱ्यांनी वाफसा झालेल्या जमिनीत पेरण्या करण्यास हरकत नाही. ज्या जमिनीत अजूनही मोठा ओलावा आहे अशा जमिनीचा वाफसा झाल्यावरही पेरण्या करता येतील.  

– राजेश  शिरसाट, तालुका कृषी अधिकारी