News Flash

वसाहतीचे ठाणे : राधानगरमधील गोकुळ

राधानगर सोसायटी, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व डोंबिवली पूर्व विभागात मानपाडा रस्त्याने सरळ गेले की रेमंड शोरूमच्या समोरील गल्लीत राधानगर आहे. प्रशस्त मैदान हे या संकुलाचे

राधानगर सोसायटी, मानपाडा रस्ता, डोंबिवली पूर्व

डोंबिवली पूर्व विभागात मानपाडा रस्त्याने सरळ गेले की रेमंड शोरूमच्या समोरील गल्लीत राधानगर आहे. प्रशस्त मैदान हे या संकुलाचे वैशिष्टय़ आहे.राधानगरमधील रहिवाशांची तिसरी पिढी आता सोसायटीचा वारसा पुढे चालवीत आहे.

दोन इमारतींमध्ये आणि आजूबाजूला प्रशस्त मोकळी जागा आहे. वरच्या मजल्यांवर जाण्यासाठी मध्यभागी एकच जिना आहे. त्यामुळे येता-जाता प्रत्येक रहिवासी समोरासमोर येतो. गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून रहिवाशांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. चारही बाजूने गर्द झाडी, मातीचे मैदान. आंबा, जांभूळ, नारळ, फणस, सर्व प्रकारच्या फुलांची झाडे असं जंगलातील वातावरण सोसायटीच्या बाजूने आहे. त्यामुळे हंगामानुसार दारासमोरील फळे खाण्याचा आनंद रहिवाशांना मिळतो. बाहेर पैसे, सोने अन्य सर्व काही मिळेल पण राधानगरसारखे नैसर्गिक वातावरण मिळणार नाही; म्हणून एकही रहिवासी आपले हक्काचे घर विकण्यास तयार नाही. काही रहिवासी नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरच्या प्रांतात गेले आहेत, पण त्यांनी राधानगरमधील खोली विकली नाही. ‘ब्लॉकमध्ये राहत असलो तरी इथे चाळीतल्यासारखे वातावरण आहे,’ असे रहिवासी माधुरी बेंद्रे सांगतात.

घरात लहान मूल जाणतेपणाने सांभाळायला कोणी नाही. मग अशा वेळी घरातील लहान मूल उचलून ते शेजारच्या मावशी, काकू, आजी ज्या कोणी असतील त्यांच्या ताब्यात सोपवून गृहिणी थेट नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी निघून जाते. एका शाळेत शिक्षण घेतलेली, एका मैदानात खेळणारी अशी मुलामुलींची दुसरी पिढी येथे वावरत आहे.

सकाळ ते रात्री उशिरापर्यंत राधानगरीतील दारे सताड उघडी असतात. आवारात कोण आले, कोणते मूल रस्त्याकडे चालले आहे, यावर प्रत्येक रहिवाशाची नजर असते. घरातले जेवण एखाद्या मुलाला आवडले नाही, तर ते सरळ घरातील रिकामे ताट घेऊन शेजारच्या काकू, मावशींच्या घरात जाऊन ‘मला तुमच्या घरात जे आहे ते वाढा’ म्हणून न संकोचता सांगते. एखाद्याच्या घरात आईबाबा रात्री उशिरा येणार असतील तर ती मुले खाऊन-पिऊन शेजारच्या घरात आरामात दूरचित्रवाणी पाहून झोपलेली असतात. इतके दिलखुलास, एकोप्याचे वातावरण सोसायटीत आहे. सोसायटीत राहणाऱ्या  कवयित्री, गझल गायक शर्वरी मुनीश्वर अतिशय अभिमानाने येथील शेजारधर्माविषयी सांगतात. घरात एखादा आवडीचा खाण्यातील पदार्थ, चवीची गोड, तिखट भाजी केली असेल तर ती शेजारच्या घरात वाटीभर जाणारच, अशी येथील संस्कृती आहे. आताच्या कॉपरेरेट, बंद सदनिका संस्कृतीत ही देवाणघेवाण दुर्मीळ झाली आहे. राधानगरच्या तिसऱ्या पिढीने मात्र ती जिवंत ठेवली आहे. येथील रहिवाशांच्या सुख-दु:खात रहिवासी सहभागी होतात. एक कुटुंब म्हणून एकजीव पद्धतीने येथील रहिवासी राहत आहेत. सोसायटीला प्रशस्त मोकळे मैदान असल्याने सकाळ, संध्याकाळ ज्येष्ठ, वृद्ध मंडळींची या ठिकाणी ऊठबस, शतपावली सुरू असते. काही जण जपमाळ ओढत, मुलांवर देखरेख करीत देवनाम घेत सोसायटीला फेऱ्या मारतात. आसपासचे रहिवासी या मोकळ्या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. मुलांचा कल्ला तर सूर्यादयापासून ते अगदी रात्री दारे बंद होईपर्यंत (शाळेतील अवधी सोडला तर) सुरू असतो. सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या प्राची कुलकर्णी सोसायटीतील मुलांसाठी योग, संस्कार शिबीर विनामूल्य घेतात. या संस्कार घडणीत तयार झालेली मुले अदबशीरपणे आपला व्यवहार सोसायटीत ठेवतात. एक वेळ मूल घरातील कोणाचे ऐकणार नाही पण, कुलकर्णी आजींची आज्ञा पाळणार. सकाळच्या वेळेत आवारातील झाडावरील ताजी फुले देव्हाऱ्यातील देवाच्या डोक्यावर ठेवण्याचे भाग्य येथील रहिवाशांना मिळते. मोकळ्या मैदानामुळे येथे क्रिकेट सामने होतात. सोसायटीचा कारभार श्रीकांत कुलकर्णी, सुनील सुर्वे व कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उमद्या मंडळींच्या हातात कारभार असल्याने आवारात सीसीटीव्ही बसविणे, वाहनांसाठी निवारा उभा करणे असे उपक्रम या मंडळींनी हाती घेतले आहेत.

नैसर्गिक आणि सांस्कृतिक श्रीमंती 

सोसायटीत दरवर्षी गणेशोत्सव असतो. पाच दिवस राधानगर गणपतीमय होऊन जाते. सोसायटीतील नवीन दाम्पत्याला पूजेचा मान दिला जातो. होळी, दिवाळी सण उत्साहात साजरे केले जातात. राष्ट्रीय सणांना तितकेच महत्त्व दिले जाते. संक्रांतीला पतंग महोत्सव होतो. महिलांची स्वतंत्र उपक्रम समिती आहे. आवारात फनफेअर भरविणे. त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रहिवाशांना देणे. महिला, मुलांच्या बाहेरगावी स्वतंत्र सहली काढणे, अशी मौजमजा वर्षभर सोसायटीत सुरू असते. गजबंधन-पाथर्ली या ऐतिहासिक ठिकाणी सोसायटी आहे. इथे पूर्वी तलाव होता. त्याचे जलस्रोत अजूनही जिवंत आहेत. त्यामुळेच सोसायटीच्या आवारातील कूपनलिकेला बाराही महिने मुबलक पाणी असते. विविध भाषिक, प्रांतामधील रहिवासी येथे गुण्या-गोविंदाने राहत आहेत. झाडांमुळे हंगामानुसार विविध स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन, त्यांचे आवाज याचा आनंद रहिवाशांना लुटता येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 2:09 am

Web Title: radha nagar society manpada road dombivli east
Next Stories
1 भाजपमधील भांडणे चव्हाटय़ावर!
2 चर्चेतील चर्च : निसर्गरम्य बंदरावरील तीर्थक्षेत्र
3 शहरबात, वसई : तात्पुरता दिलासा!
Just Now!
X