राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंच्या सुरांचा दरवळ
शहरातील मध्यवर्ती तलावाच्या चोहीकडे विद्युत रोषणाई…निळ्या, पिवळ्या आणि चमकदार विद्युत दीपमाळांनी प्रकाशमान झालेला परिसर..झाडांवर आकाशदिव्यांची सजावट..तलावाच्या काठावर उभारलेल्या तरंगत्या रंगमंचावर रंगलेली संगीत क्षेत्रातील दिग्गजांची मैफल आणि त्याचा मनमुराद आस्वाद घेणारे ठाण्यातील दर्दी रसिक. असे अत्यंत देखणे आणि विलोभनीय दृश्य शुक्रवारी ठाण्याच्या तलावपाळी परिसरात अवतरले होते. राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंसारख्या दिग्गज कलाकारांनी तरंगत्या रंगमंचावरील पहिल्या सादरीकरणाने ठाणेकरांची मने जिंकली.
संमेलनाच्या आठ दिवस अगोदर सुरू झालेल्या पूर्वारंभ कार्यक्रमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. मात्र उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी आयोजित पहाटेच्या कार्यक्रमाला मात्र रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. थंडीचा बहर ओसरला असला तरी मासुंदा तलावाच्या पाण्यामुळे वातावरणामध्ये गारठा जणावत होता. अनेक रसिकांनी तलावातील काठावर हजेरी लावली होती. सकाळी सहा वाजता कार्यक्रमाची वेळ असल्याने साडेपाचपासूनच या भागात हजेरी लावण्यास सुरूवात झाली होती.
नाटय़संमेलनाच्या पूर्वारंभाचे प्रमुख केंद्र असलेल्या गडकरी रंगायतनवर विद्युत रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे शहरातील नाटय़वैभव असलेली ही वास्तू सजून गेली आहे. रंगायतनच्या मुख्यप्रवेशद्वार सजवण्यात आले असून प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला संमेलनाचे बोधचिन्ह लावण्यात आले आहे.

नाटय़संगीतामुळे रसिक मंत्रमुग्ध..
नाटय़संगीत आणि बंदिशींचे एकत्रित सादरीकरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना अनुभवता आला. सारंगवराळी रागामध्ये ‘घेई छंद मकरंद’ हे नाटय़संगीत गाऊन राहूल देशपांडे याने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर आनंद भाटे यांनी ‘मियॉं की तोडी’ आणि अभंग गात रसिकांसमोर नाटय़संगीताचा दर्जेदार खजिना खुला केला. याशिवाय नाटय़संगीतातील पदे आणि चित्रपटांमधील नाटय़संगीताचे सादरीकरण करून रसिकांना नाटय़संगीताचा स्वर्गीय आनुभव दिला.