ठिकठिकाणी गाडय़ा चोरायच्या आणि नंतर चोरीच्या गाडय़ा वापरून दरोडे टाकायचे. ही या टोळीची कार्यप्रणाली होती. रायगड पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे ही टोळी जेरबंद करण्यात यश आले..

२६ ऑगस्ट २०१५ला रात्री ९च्या सुमारास अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे सुरभी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा पडला. धारदार शस्त्रांचा धाक दाखवून दरोडेखोरांनी ८० लाख रुपयांचा ऐवज आणि ९ लाख रुपये रोख असे एकूण ८९ लाख पळवून नेले. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या या ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली होती. कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ  लागले होते. धाडसी दरोडय़ाची उकल करण्याचे मोठ आव्हान पोलिसांसमोर होते.

Video How To Clean Sticky Oil Bottle with Spoonful of Rice Remove Bad Smell and stickiness from plastic
तेलाच्या चिकट बाटलीत चमचाभर तांदूळ टाकून तर बघा; ५ मिनिटांत डाग, दुर्गंध असा करा गायब, पाहा Video
goa mango farmers deploy jamun to fight
फक्त १० रुपयांच्या जांभळांनी वाचवा आंब्याची बाग? शेतकऱ्याने सांगितला माकडांच्या हल्ल्यापासून वाचण्याचा हटके जुगाड!
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

दरोडय़ाच्या वेळेस स्थानिक नागरिकांशी झालेल्या झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलीस तपासासाठी हा एक मोठा दुवा होता. मात्र तो तपासात सहकार्य करत नव्हता. गुन्ह्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हानकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहनिरीक्षक राजमहंमद राजे, सायबर सेलचे प्रमुख प्रमोद बडाख, सुरेंद्र गरड, सुदर्शन गायकवाड या पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

या घटनेनंतर पोलिसांनी जिल्ह्यात सर्वत्र कोंबिंग ऑपरेशन सुरू केले होते. संशयित गाडय़ांची तपासणी करण्याचे निर्देश चेकनाक्यांना देण्यात आले. पण काही हाती लागत नव्हते. दरोडा टाकून सँन्ट्रो कारमधून पळालेले आरोपी पाली मार्गे पुण्याच्या दिशेने निघाले होते. मात्र यावेळी त्यांची गाडी पेडलीजवळील एका खड्डय़ात अडकली. त्यामुळे त्यांनी रोहा येथून इतर सहकाऱ्यांना बोलावून घेतले. मात्र रात्रीच्या वेळी या सर्वाच्या हालचाली संशयास्पद असल्याचे स्थानिकांना जाणवले. आणि त्यांनी या सर्वाना रोखण्याचा प्रयत्न सुरू केला. धास्तावलेल्या दरोडेखोरांनी गाडी सोडून पळ काढण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले, तर इतर जण अंधाराचा फायदा घेऊन पेडली येथील जंगलात पसार झाले. या गाडीतून पोलिसांनी गावठी कट्टा, धारदार शस्त्रे आणि ८५ ग्रॅम सोने जप्त केले.

गुन्ह्याच्या तपासात हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून आले. आरोपींनी दरोडा टाकण्यापूर्वी दुकानाची रेकी केल्याचे समोर आले. सुरभी ज्वेलर्स मध्ये असलेल्या एकूण मालाची पूर्ण माहिती आरोपींना होती. त्यामुळे या दरोडय़ात स्थानिकांचा सहभाग असण्याचा संशय तपास अधिकाऱ्यांना आला. त्या दिशेने तपास सुरू केला. अटक करण्यात आलेला आरोपी हा तामिळनाडू राज्यातील रहिवासी असल्याने या गुन्ह्यात आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यामुळे एक तपास पथक तामिळनाडूमध्ये पाठवण्यात आले.

संशयितांची रेखाचित्रे बनवण्यात आली. ती ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात पाठवण्यात आली. तपासपथकांतील चार टीम्स या चारही जिल्ह्यात पाठवण्यात आल्या. अखेर तपासाला यश आले. गुन्ह्यातील सुरुवातीला ४ आरोपींना जेरबंद करण्यात यश आले होते. यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण ११ आरोपींना रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडून एक किलो ३३२ ग्राम सोने व काही रोख रक्कम मिळून ३० लाख ३८  हजार ५७४ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींकडून दरोडय़ात वापरलेल्या व अन्य अशा चार गाडय़ा जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान आरोपींनी दरोडय़ात लुटून नेलेल्या सोन्यापैकी काही सोने मीरा भाईंदर येथील सराफाला विकल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी त्या सराफाला अटक करून त्याच्याकडून ५१० ग्राम सोने हस्तगत केले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पूर्वइतिहास पोलिसांनी पडताळून पाहिला. यात चार जणांवर चेंबूर, बोरिवली, दहिसर, ठाणे आणि भिवंडी परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान दरोडा टाकल्यानंतर पळून जाण्यासाठी यांनी स्थानिकांच्या एका गाडीचा वापर केल्याचे समोर आले. ठिकठिकाणहून गाडय़ा चोरायच्या आणि नंतर याच गाडय़ांचा वापर करून चोऱ्या आणि दरोडे टाकायचे ही या टोळीची कार्यप्रणाली होती.

तपासात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हानकोटी, पोयनाड पोलीस ठाण्याचे सहनिरीक्षक राजमहंमद राजे, सायबर सेलचे प्रमुख प्रमोद बडाख, सुरेंद्र गरड, सुदर्शन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तपासात दाखवलेली तत्परता आणि मोबाइल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाची मदत आणि स्थानिक नागरिकांची सतर्कता महत्त्वाची ठरली. सध्या याप्रकरणी अलिबाग सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे.