अपुऱ्या लोकलगाडय़ा.. वारंवार होणारे बिघाड आणि खोळंबा.. रेल्वे फलाट आणि पोकळीमुळे होणारे अपघात.. वैद्यकीय सुविधांची वानवा.. स्थानकांची दुरवस्था अशा सर्व समस्यांपासून रेल्वे प्रवाशांना अजूनही स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे आता रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वातंत्र्यदिनीच आंदोलनाचा पवित्रा घेतला असून मध्य रेल्वेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांतील प्रवासी काळ्या फिती लावून प्रवास करणार आहेत. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे आणि डोंबिवली स्थानकांत निषेध सभाही घेतली जाणार आहे.
उपनगरी रेल्वेचा प्रवास सुसह्य़ करण्यासाठी विविध मागण्या करणारे पत्र उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने महिनाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले होते. तसेच या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने या मागण्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात आवाज उठवला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी या आंदोलनाची सुरुवात करण्याचा निर्णय प्रवासी संघटनेने घेतला आहे. शनिवारी ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरांतील प्रवासी आंदोलन करतील, अशी माहिती संघटनेने शुक्रवारी दिली. शनिवारी सकाळी ११.३० वाजता कल्याणच्या फलाट क्रमांक एक येथून या आंदोलनास सुरुवात केली जाणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे प्रवासी संघटना व खासदार यांच्याशी चर्चा करण्याचे आदेश दिलेले असतानादेखील रेल्वे प्रशासन प्रवासी संघटनांशी कोणतीही चर्चा करण्यास पुढे येत नाही, असा या प्रवासी संघटनांचा आरोप आहे. यासाठी उपनगरी प्रवासी महासंघातर्फे शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते १ या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ‘निषेध आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशी माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. त्यानंतर काळ्या फिती लावून प्रवास केला जाईल आणि ठाणे स्थानकातही सभा घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण आणि डोंबिवली स्थानकात प्रवाशांना या वेळी काळ्या फिती पुरविण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त प्रवाशांनी काळ्या फिती लावाव्यात, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

प्रवासी संघटनांच्या मागण्या..

’कल्याण-कर्जत चौथी मार्गिका हवी
’कर्जत पनवेल लोकल सेवा सुरू करा
’अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी वैद्यकीय सुविधा
’कल्याण पालिकेच्या ग्रामीण भागातील स्थानकांना न्याय.
’लोकल सेवा वाढवण्यासाठी पाचव्या सहावी मार्गिका सुरू करणे.
’लोकल गाडय़ांचे डबे वाढवणे.
’प्रत्येक स्थानकात मार्गदर्शक समितीची स्थापना करावी.