कोपर पश्चिमेतील रेल्वे स्थानकालगत असलेली सिद्धार्थनगर झोपडपट्टी तोडण्यास आलेल्या पथकाला विरोध करण्यासाठी झोपडपट्टीधारकांनी गुरुवारी सकाळी रेल्वे प्रवाशांना वेठीस धरले. झोपडीधारकांनी झोपडपट्टीवर जेसीबी फिरवू नये, या मागणीसाठी कोपर रेल्वे स्थानकात २५ मिनिटे रेल रोको केला. त्यामुळे मुंबई-कर्जतकडे जाणारी लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून झोपडीधारकांना रेल्वे मार्गावरून दूर केल्याने रेल्वेसेवा पूर्ववत झाली.

कोपर रेल्वे स्थानकालगत अनेक वर्षांपासूनची सिद्धार्थनगर झोपडपट्टी आहे. ही झोपडपट्टी तोडण्यासाठी रेल्वे अधिकारी, पोलीस, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस आज सकाळी सिद्धार्थनगर येथे आले होते. सिद्धार्थनगर झोपडीवासीयांना याची चाहूल अगोदरच लागली होती. त्यामुळे रहिवाशांनी कामाला दांडय़ा मारून संघटितपणे झोपडय़ा तोडण्यास कडाडून विरोध केला.

महिला, पुरुष, लहान मुले यांचा जमाव पाडकामासाठी आलेल्या पोलीस, अधिकाऱ्यांच्या अंगावर गेला. पहिले आमचे पुनर्वसन करा, आम्हाला पर्यायी जागा द्या, आम्ही चाळीस वर्षांपासून या ठिकाणी राहत आहोत, अशा मागण्या झोपडीधारकांकडून करण्यात येत होत्या. हे आर्जव सुरू असताना काही झोपडीधारक थेट कोपर रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळावर गेले. त्यांनी लोकल अडवून धरण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही परिस्थितीत झोपडीवर जेसीबी फिरवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका झोपडीधारकांनी घेतल्याने, रेल्वेला झोपडय़ांवर कारवाई न करता माघारी फिरावे लागले. दरम्यान, या गोंधळामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.