नालासोपारा येथील हृदयद्रावक घटना
नालासोपारा येथून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन सख्ख्या भावांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. वडिलांच्या एटीएममधून पैसे चोरून त्यांनी मोबाइल विकत घेतला होता. चोरी पकडली जाईल या भीतीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नालासोपारा पूर्वेच्या बाबूलपाडा येथील मटकेवाली चाळीत कुंदन गुप्ता हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. गुरुवारी दुपारी त्यांची दोन्ही मुले प्रवीण गुप्ता (वय १६) आणि अरुण गुप्ता (१३) हे बेपत्ता झाले. दोघेही अल्पवयीन असल्याने याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घरातून जाताना त्यांनी वडिलांचे एटीएम कार्डही नेले होते. त्याद्वारे त्यांनी ३७ हजार रुपयेही काढले होते. दरम्यान, शनिवारी वडील कुंदन यांना दोन्ही मुले अलकापुरी येथे दिसली होती. त्यांनी मुलांना घरी येण्यास सांगितले असता दोघे वडिलांच्या हाताला झटका देऊन पळून गेले. मुले नालासोपाऱ्यातच आहेत, त्यामुळे घरी परत येतील, असे कुंदन यांना वाटले. मात्र त्याच रात्री त्यांनी नालासोपारा येथील फलाट क्रमांक चारसमोरील रुळावर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दोन्ही मुले एकमेकाचा हात धरून ट्रेनखाली आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या मुलांनी काही दिवसांपूर्वी वडिलांच्या एटीएम कार्डमधून ६ हजार रुपये काढून मोबाइल विकत घेतला होता. त्यामुळे पालक संतापले होते. त्यानंतर घर सोडून जाताना त्यांनी पुन्हा एटीएम कार्ड चोरून नेले होते. शुक्रवारी त्यांनी एटीएममधून ३७ हजार रुपयेदेखील काढले. चोरी पकडली जाईल व वडील रागावतील या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.