बोरिवली-विरार दरम्यान रेल्वे प्रशासनाची कारवाई

वसई : लोकल ट्रेनमध्ये जागा अडवून प्रवाशांची अडवणूक करणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा बलाने सुरू केलेल्या मोहिमेत तब्बल ५८४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे रेल्वेत दादागिरी करणाऱ्या प्रवाशांना चाप बसला आहे.

सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकलच्या दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशाकडून चढू आणि उतरू दिले जात नव्हते. याबाबत अनेक तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने ४ ऑक्टोबर २०१८ पासून विशेष मोहीम सुरू केली. दिवाळीनिमित्ताने सुटी असल्याने काही दिवस मोहीम थंडावली होती, मात्र आता पुन्हा मोहीम जोराने सुरू करण्यात आली आहे. विरार ते बोरिवलीदरम्यानच्या स्थानकात ही मोहीम सुरू आहे. मोहिमेत तब्बल ५८४ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कारवाईही वेगाने सुरू झाली आहे. त्यामुळे दादागिरी आणि मुजोरी करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच चाप बसला आहे.

ही कारवाई करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले होते. त्यात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपचाही आधार घेतला जात होता. लोकल ट्रेनच्या डब्यात कुणी जागा अडवताना दिसले तर त्याचे छायाचित्रे काढून ते व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर टाकले जात होते. पुढील स्थानकात ही ट्रेन आल्यावर तिथे तैनात पोलीस कर्मचारी छायाचित्राच्या आधारे त्या प्रवाशांवर कारवाई करत होते.

ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे यासाठी रेल्वे सुरक्षा विभागामार्फत लक्ष ठेवण्यात आले आहे.

– जी. एन. मल्ल, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख.