पालघर-विरारच्या प्रवाशांच्या वादासंदर्भातील बैठक तोडग्याविना; प्रवाशांच्या तक्रारींपुढे रेल्वे प्रशासन हतबल

वसई-विरार आणि पालघरच्या रेल्वे प्रवाशांमधील वाद वाढला असून या वादावर तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटना, रेल्वे पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली आहे. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाहीच, पण प्रवाशांच्या असंख्य तक्रारींमुळे रेल्वे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून विरार-पालघरच्या प्रवाशांमध्ये संघर्ष सुरू असून हाणामारीचेही अनेक प्रसंग घडले आहेत. शनिवारी तर लोकलच्या डब्यात उभे राहण्यावरून झालेल्या वादात तीन महिलांनी एका महिलेला मारहाण करत तिच्या हाताचा चावा घेतला होता.

[jwplayer izOWW4O7]

गेल्या काही दिवसांपासून डहाणू लोकलमध्ये विरार आणि पालघरच्या प्रवाशांचे वाद होत आहेत. डहाणू लोकलमध्ये विरारच्या प्रवाशांना चढण्यास पालघरचे प्रवासी मज्जाव करत आहेत, तर विरारचे प्रवासी तेवढय़ाच ताकदीने विरोध करत आहेत. विरारच्या प्रवाशांना केलेल्या तक्रारीवरून पालघरच्या ११ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. यावेळच्या कारवाईत पालघरच्या प्रवाशांना मारहाणही झाली होती. सतत होणारे वाद आणि हाणामारी यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने वरिष्ठ अधिकारी, पोलीस तसेच पालघर आणि विरारच्या प्रवाशांमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र मूळ मुद्दय़ाऐवजी प्रवाशांनी असंख्य तक्रारींचा पाऊस पाडला. या तक्रारी रेल्वे प्रशासनाविरोधात होत्या. प्रवाशांनी सामोपचाराने घ्यावे आणि एकमेकांना सहाकार्य करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले. मात्र प्रवाशांच्या मागण्या व तक्रारी वाढत असल्याने त्यापुढे रेल्वे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ही सामोपचाराची बैठक व्यर्थच ठरली.

प्रवाशांच्या मागण्या

* लोकशक्ती एक्स्प्रेसला पुन्हा विरार, सफाळे, पालघरला थांबा द्या.

* डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढवा.

* रात्री नऊनंतर महिलांचा डबा पुरुषांच्या डब्यात परावर्तित होत असल्यामुळे आधीपासून प्रवास करत असलेल्या महिलांची अडचण होते. त्यामुळे या डब्याच्या परावर्तनाची वेळ वाढवावी.

* ऐनवेळी गाडी दुसऱ्याच फलाटावर येत असल्याने प्रवाशांना त्रास.

* विरारचे प्रवासी वैतरणा, सफाळापर्यंतचा पास काढतात आणि लांब पल्लय़ाच्या गाडय़ातून प्रवास करतात, यावर बंदी घालावी.

विरार-पालघर प्रवाशांमधील संघर्षांच्या घटना

* २८ जून :

विरार येथे राहणारी ऋतुजा नाईक या तरुणीने वसईला उतरण्यासाठी चर्चगेट लोकल पकडली होती. परंतु तिला उतरू देण्यात आले नव्हते. वसईला उतरायचे मग अंधेरी किंवा बोरीवली लोकल न पकडता चर्चगेट लोकल का पकडली, असा सवाल करत चार महिलांनी तिला बेदम मारहाण केली होती. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी चार महिलांना अटक केली होती.

* २० ऑक्टोबर

डहाणू लोकलमध्ये चढललेल्या विरारच्या एका प्रवाशाला पालघरच्या प्रवाशांनी विरार स्थानकात उतरू दिले नव्हते. त्याच्या तक्रारीवरून रेल्वे सुरक्षा बलाने पालघरच्या १४ प्रवाशांना विरार स्थानाकातून अटक केली. यावेळी अनेक प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

* ८ नोव्हेंबर

डहाणू रेल्वे स्थानकातून सुटलेली चर्चगेट लोकल सकाळी ८ वाजून ३६ मिनिटांनी विरारच्या फलाट क्रमांक चारवर आली होती. विरार स्थानकातील महिला नेहमीप्रमाणे या लोकलमधील डब्यात चढण्यासाठी सज्ज झाल्या. परंतु आतील महिलांच्या या डब्याचे दार दार बंद केले होते. रेल्वे पोलिसांच्या मध्यस्तीनंतर दार उघडण्यात आले.

* १९ नोव्हेंबर

नालासोपारा येथे राहणाऱ्या प्रभा देवा या महिलेलाल चर्चगेट लोकलमध्ये महिलांनी मारहाण करून हाताचा चावा घेतला. दारात उभे राहण्यावरून वाद झाला होता. वसई रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांना अटक केली.

[jwplayer OnydZc5l]