तानशेत थांब्यावर ‘शिवडी’ स्थानकाच्या घोषणेचा घोळ सुरू
कल्याणमधून कसाराकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तानशेत आणि उंबरमाळी या दोन थांब्यांची अनेक र्वष उद्घोषणा होत नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडत असे. हा गोंधळ थांबविला जावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अखेर तानशेत आणि उंबरमाळी स्थानकांची उद्घोषणा लोकल गाडय़ांमध्ये करण्यास नुकतीच सुरुवात केली आहे. असे असले तरी रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे तानशेत स्थानकाचा उल्लेख ‘शिवडी’ असा होऊ लागला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गोंधळात काही वेळा भर पडते. दिशादर्शक फलकावर स्थानकांची नावे योग्य पद्धतीने दाखवली जात असली तरी उद्घोषणा मात्र शिवडी स्थानकाची होऊ लागल्याने प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर आटगाव आणि खर्डी स्थानकादरम्यान तानशेत तर खर्डी आणि कसारा दरम्यान उंबरमाळी ही छोटी स्थानके आहेत. तानशेत स्थानकाचा फायदा परिसरातील २२ हून अधिक गावांतील प्रवासी घेतात तर उंबरमाळी स्थानकात आसपासच्या परिसरातील २६ पेक्षा जास्त गावांतील सुमारे सात हजार प्रवासी प्रवास करत असतात. दिवसेंदिवस या भागातील प्रवाशांची संख्या वाढली असली तरी येथील या छोटय़ा थांब्यांना स्थानकाचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे या स्थानकात उतरण्यासाठी केवळ मातीचा फलाट असून तिकीट खिडकी, छप्पर, स्थानकाची इमारत आणि अन्य सोयी-सुविधांची इथे कमतरता दिसून येते. त्यामुळे प्रवाशांना नेहमीच हे थांबे त्रासदायक असून प्रवासी संघटनांकडून तेथे सेवा-सुविधा उपलब्ध होण्याची मागणी केली जात आहे. या थांब्यांवर लोकल थांबत असल्या तरी स्थानकाच्या उद्घोषणा मात्र होत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत होते. खर्डीनंतर कसारा स्थानक येते या समजुतीने अनेक प्रवासी तानशेत थांब्यावर उतरत असत. रात्रीच्या वेळी त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविषयीच्या उद्घोषणा सुरू व्हाव्यात, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. अखेर या स्थानकांची उद्घोषणा करण्यास रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र त्यामध्येही घोळ केला असून तानशेत स्थानकात चक्क शिवडी स्थानकाची उद्घोषणा सुरू झाली आहे, अशी माहिती कल्याण, कसारा, कर्जत प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिली.