मुंबई उपनगरीय रेल्वेचा विचार करता सर्वाधिक गर्दीचा मार्ग म्हणून मध्य रेल्वेची ओळख असून डोंबिवली, ठाणे, कल्याण या स्थानकांपाठोपाठ दिवा, अंबरनाथ आणि बदलापूर स्थानकांचाही गर्दीच्या स्थानकांमध्ये क्रमांक पटकावण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेचा उल्लेख अर्थसंकल्पातील भाषाणामध्ये नेहमीच झाला आहे. शटल सेवा, ठाकुर्ली टर्मिनस, कल्याण-कळवा उन्नत ऐरोली मार्ग यांसारख्या घोषणांनी मागील पाच वर्षांत मध्य रेल्वेचे महत्त्व अधोरेखित केले होते. असे असले तरी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्य रेल्वेच्या वाटय़ाला एकही भरीव घोषणा करण्यात आलेली नाही.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या रेल्वे अर्थसंकल्पीय भाषणाकडे डोळे लावून राहिलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या हाती विशेष असे काहीच लागले नाही. त्याच वेळी नव्या गोष्टी पदरात पाडून घेण्यात नेहमीच आग्रही असलेल्या पश्चिम रेल्वेच्या वाटय़ाला चर्चगेट-विरार उन्नत मार्गाची घोषणा झाली. तर यंदा पहिल्यांदाच मध्य रेल्वेच्या तुलनेत कमी गर्दी असलेल्या हार्बर मार्गाने मध्य रेल्वेच्या आधी सीएसटी-पनवेल उन्नत मार्गाची घोषणा खेचून घेतली. त्यामुळे उपनगरीय रेल्वेचा मुख्य मार्ग म्हणून पारंपरिक ओळख असलेल्या सीएसटी-कल्याण मार्गाला या अर्थसंकल्पामध्ये पुरती बगल मिळाल्याची भावना मध्य रेल्वेचे प्रवासी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय मंडळींनी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावून जुन्या झालेल्या सर्वाधिक गाडय़ा मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावतात. त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून जुन्या रेट्रो गाडय़ांमध्ये एका डब्याला केवळ दोनच दरवाजे असल्याने प्रवाशी गुदमरून जातात. त्यात प्रवाशांच्या तुलनेत कमी रेल्वे फेऱ्या असल्याने गर्दीच्या काळात लोकल गाडय़ांमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होते. डब्यात चढायला न मिळालेले प्रवासी दारात लोंबकळतात आणि गर्दीचा दाब वाढल्यानंतर डोंबिवली-कोपर, दिवा, आणि ठाणे यांच्यामध्ये पडून मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा पावसामध्ये बंद होते, ओव्हरहेड वायर तुटतात, रेल्वे रुळांना तडे जातात, इंजिनमध्ये बिघाड होऊन मार्ग बंद होते, अशा अनंत अडचणींचा सामना प्रवाशांना नेहमीच करावा लागतो. बोटावर मोजण्याइतक्या लोकांना हा त्रास होत असता तर एक वेळ समजता आले असते, मात्र हा त्रास वेगवेगळ्या शहरांतील सुमारे ४० ते ५० लाख लोकांना एकाच वेळी सहन करावा लागतो, हे अत्यंत दुर्दैवी असून रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या प्राथमिक प्रवासाच्या गरजा पूर्ण होण्याच्या दृष्टीने आश्वासक घोषणांची गरज होती. देशाच्या दृष्टीने अत्यंत संतुलित असलेला हा रेल्वे अर्थसंकल्प मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी मात्र असंतुलित असाच ठरला. एकीकडे गरज नसलेल्या भागांमध्ये उन्नत रेल्वेची घोषणा होत असताना लाखो प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक भागात मात्र कोणतीच भरीव तरतूद नसल्याचे शल्य प्रवाशांना टोचू लागले आहे.
मुंबई, ठाण्याचे रेल्वे प्रवासी रोज सकाळी जीव मुठीत धरून प्रवास करतात. या प्रवासांना फक्त भाडेवाढ नाही हा एकमेव दिलासा प्रवाशांना मिळाला आहे. सुविधाच नसल्याने ही भाडेवाढ नसल्याचे समाधान मानावे का, हासुद्धा एक प्रश्न प्रवाशांना पडतो आहे. दिवसाला सरासरी १० मृत्यू हे रेल्वेच्या हद्दीत होत आहेत. त्यांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे अर्थसंकल्पात भरीव तरतूद दिसली नाही. वाढत्या मृत्यूने अस्वस्थ झालेल्या उच्च न्यायालयाने रेल्वेला फलाटांची उंची वाढवा, रुग्ण सेवा पुरवा अशा सूचना केल्या होते. त्यामध्ये आश्वासक उत्तरे रेल्वे अर्थसंकल्पातून मिळू शकलेली नाही. रेल्वेमंत्र्यांनी या विषयी सहानुभूती व्यक्त केली असली तरी त्यातून साध्य काय होणार, हा प्रश्न आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठय़ा घोषणांची कोणतीच अपेक्षा या रेल्वे अर्थसंकल्पामधून नव्हती. त्यामुळे भ्रमनिरास झाला असे म्हणता येणार नाही. मात्र या पूर्वीच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणांच्या पूर्ततेसाठी काही तरी व्यापक करा, अशा प्रवासी संघटनांच्या मागण्या होत्या. हे मात्र पूर्ण होऊ शकलेले नाही. गाडय़ांची संख्या, ट्रॅकची संख्या, वातानुकूलित लोकल, नव्या लोकलची सुरुवात, स्थानकांची पायाभूत सुविधा, अशा घोषणांची पूर्तताही होऊ शकलेली नाही, याची खंत लागून राहिली आहे. पनवेल-सीएसटी उन्नत रेल्वे मार्ग सुरू होण्यास अनेक वर्षे जातील. त्याबरोबर ठाणे-वाशी मार्गावरील लोकल आता वाशी ते ठाणे व पुढे मध्य रेल्वेच्या मार्गावरून सीएसटी जलद मार्गावर चालवण्याची सूचना लोकप्रतिनिधींनी सुरू केली आहे. तसेच ठाणे ते वाशी लोकल पुढे हार्बर मार्गावरून कुर्ला-वडाळा सीएसटी तसेच अंधेरी आदी मार्गावर चालवली तर, हजारो प्रवाशांना गर्दीतून उतरून दुसरी रेल्वे पकडण्याच्या त्रासातून सुटका होऊ शकेल, अशा मागण्या यापुढे लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांकडून सुरू होऊ शकणार आहेत. रेल्वे अर्थसंकल्पात ज्येष्ठांसाठी ५० टक्के सीट आरक्षण सुचवले आहे. मात्र ठाण्यासारख्या स्थानकातून संध्याकाळच्या वेळेस गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये ज्येष्ठ सोडा तरुण माणसालादेखील प्रवेश मिळू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. अर्थसंकल्प भविष्यावर लक्ष देणारा असला तरी त्यामध्ये वर्तमानकाळातील काही प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न असणे गरजेचे होते. त्यातून प्रवाशांच्या हालअपेष्टा कमी होण्यास मदत होऊ शकली असती. या सगळ्या त्रुटी लक्षात घेऊन पुढील काळात या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रवाशी संघटनांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
ठाणे स्थानकाच्या व्यथा
ठाणे रेल्वे स्थानकात १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे धावली. स्थानकात एकूण १० फलाट आहेत. फलाट क्रमांक ६, ७ आणि ८ या फलाटांवर २४ डब्यापर्यंत गाडय़ा थांबू शकतात. १८ तिकीट खिडक्या आहेत. ठाणे पश्चिमेला १३, ठाणे पूर्वेला ४, सॅटिसवर १ अशी संख्या आहे. सकाळच्या सत्रात १८ खिडक्या उघडय़ा असतात. संध्याकाळी १४ खिडक्या खुल्या असतात. स्थानकात २६ एटीव्हीएम मशिन्स उपलब्ध आहेत. ठाण्यातून सीएसटी, दादर, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, कल्याण, कसारा, वाशी, नेरुळ, बेलापूर, पनवेल या मार्गावर लोकल गाडय़ा सुटतात. ६०१ लोकल ठाणे स्थानकातून धावतात, तर ४७ मेल एक्स्प्रेस ठाण्यात थांबतात. ठाण्याचे एकूण मासिक उत्पन्न १४ कोटी असून स्थानकांमध्ये अ दर्जाचे स्थानक आहे. २०१५ मध्ये रेल्वे अपघातामध्ये सुमारे ३५७ जाणांचा बळी गेला असून दिवसाला सरासरी एका व्यक्तीचा मृत्यू ठाणे रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडत आहे. या बळींबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केल्यावर ठाणे फलाट दोनवर आपत्कालीन वैद्यकीय सहायता केंद्र सुरू करण्यात आले आहे. ठाणे ते मुलुंड दरम्यान नवीन उन्नत रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पडून आहे. रेल्वेने त्याचा अहवाल सादर केला असून नव्या स्थानकासाठी १५० कोटी खर्च होणार आहे. उर्वरित खर्च महापालिकेच्या सहभागातून उभारायचे आहे. जानेवारी २०१५ मध्ये सुरेश प्रभू ठाण्याला आले होते. त्या वेळी त्यांनी नवीन रेल्वे स्थानकाच्या मागणीला पाठिंबा देत रेल्वे अधिकाऱ्यांना अहवाल सादर करायला सांगितला होता. तांत्रिक अहवाल रेल्वेने तयार केला असून उच्च न्यायालयाला सादर केले आहे. तसेच कल्याणकडील प्रवाशांना नवी मुंबईला जाताना ठाणे येथे उतरून दुसरी लोकल पकडण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी ऐरोली ते डोंबिवली असा एलिव्हेटेड रेल्वेचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मागील अर्थसंकल्पात या प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या आडमुठय़ा धोरणाने प्रकल्पाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. रेल्वे मार्गावरील ठाणे एक गर्दीचे स्टेशन आहे, नवीन रेल्वे स्थानक झाल्यावर ठाणे सीएसटी स्लो गाडय़ा तेथून चालवता येऊ शकतात. ठाण्याहून पुढे कर्जत-कसारा मार्गावर शटल लोकल सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांची होती त्याची फारशी अंमलबजावणी होताना दिसत नाही.
मध्य रेल्वेतील सर्वाधिक गर्दीची स्थानके
सीएसटीपासून कसारा, खोपोली, पनवेल, अंधेरी आणि ठाणे-वाशी-नवी मुंबई पाच सेवांतर्गत ८५ रेल्वे स्थानकात धावणाऱ्या मध्य रेल्वेत डोंबिवली हे सर्वाधिक गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. त्यातून दररोज २ लाख ३३ हजार ६३५ प्रवासी प्रवास करतात. कमाईतही डोंबिवली स्थानक अव्वल असून १४ लाख ९४ हजार ५३८ रुपयांचे उत्पन्न रेल्वेला या स्थानकातून मिळते. दररोज ३८ लाख ५५ हजार ४१६ प्रवाशांचा भार मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर असून या मार्गावरून २ कोटी १९ लाख १२ हजार ८३७ रुपयांचे उत्पन्न या मार्गाकडून प्राप्त होते. गर्दीच्या पहिल्या पाच स्थानकांमध्ये डोंबिवली, ठाणे, कल्याण, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांचा समावेश आहे. सर्वाधिक गर्दीचे स्थानक डोंबिवली असून त्यानंतर ठाणे (२,२५,४९०), कल्याण (१,८०, ६७६), घाटकोपर (१,७४,९२६) आणि कुर्ला (१,५०,७०८) अशी आकडेवारीनुसार क्रमवारी आहे. या पाच स्थानकांचे उत्पन्न डोंबिवली (१४,९४,५३८), ठाणे (१३,८४,०२०), कल्याण (१२,५५,०४५), घाटकोपर (९,३२,४८५) आणि सीएसटी (८,९७,३७३) इतके आहे.
अपघातातील मृत्यूची आकडेवारीही मोठी
गेल्या चार वर्षांमध्ये धावत्या गाडीतून पडून २१२७ जणांचा मृत्यू झाला, तर रेल्वे रूळ ओलांडताना ४६४३ लोकांनी प्राण गमावले आहे. गाडीतून पडून मृत्यू झालेल्यांची २०१३ मध्ये सर्वाधिक संख्या असून ही ६१० इतकी मोठी आहे. कोपर स्थानकाच्या परिसरामध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डोंबिवली स्थानकातील वाढलेल्या गर्दीमुळे हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भावेश नकाते, धनश्री गोडवे यांच्या मृत्यूमुळे डोंबिवली ते कोपर प्रवासातील भीषणता लक्षात आल्याशिवाय राहत नाही.
श्रीकांत सावंत