25 September 2020

News Flash

घाईतला शॉर्टकट, आयुष्याचा शेवट!

रेल्वे सुरक्षा यंत्रणाही या प्रवृत्तीला लगाम घालण्यात अपयशी ठरल्या आहेत.

ठाणेपल्याडच्या मार्गावर रूळ ओलांडताना अडीच वर्षांत १,४२५ प्रवाशांचा मृत्यू

रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस आणि विविध सामाजिक संघटना जनजागृती करीत असले तरी, आपला वेळ वाचवण्यासाठी घेतला जाणारा ‘शॉर्टकट’ अनेक प्रवाशांच्या आयुष्याचा शेवट करीत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून रूळ ओलांडण्याच्या प्रवृत्तीमुळे ठाण्यापुढील रेल्वे मार्गावर गेल्या अडीच वर्षांत तब्बल १४२५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे, रूळ ओलांडणाऱ्यांना १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद असतानाही लाखो प्रवासी बिनदिक्कत रेल्वे रूळ ओलांडत असतात. तर अपुरे मनुष्यबळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणाही या प्रवृत्तीला लगाम घालण्यात अपयशी ठरल्या आहेत.

मुंबई परिसरात नोकरी करणारे लाखो प्रवासी ठाणे जिल्ह्य़ातील उपनगरांमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांत ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण ते थेट अंबरनाथ-बदलापूपर्यंतच्या शहरांची लोकसंख्या कैक पटींनी वाढली. मात्र प्रवाशांच्या तुलनेत रेल्वे स्थानकांतील सुविधा अत्यंत तोकडय़ा आहेत. प्रवाशांना ये-जा करण्यासाठी पादचारी पूुल अपुरे आणि गैरसोयीचे असल्यानेही चोरवाटांचा अवलंब केला जात असल्याचे दिसून आले आहे. मात्र एकुणात प्रवाशांची बेफिकिरी आणि रेल्वे प्रशासनाची बेफिकिरी यामुळे रेल्वे प्रवास धोकादायक ठरताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांत ठाणे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना तब्बल ५४८ जण मृत्युमुखी पडले. याच काळात कल्याण स्थानकात ६०० जणांना रूळ ओलांडताना जीव गमवावा लागला. डोंबिवली स्थानकात या काळात २७७ जण मरण पावले. थोडक्यात, ९१५ दिवसांत तब्बल १४२५ जण केवळ रूळ ओलांडताना जिवास मुकले आहेत. दर महिन्याला फक्त ठाणेपलीकडच्या स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना तब्बल ४५ ते ५० जणांचा बळी जात आहे. याच काळात उपरोक्त स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना झालेल्या अपघातातील जखमींची संख्या तुलनेने खूपच कमी म्हणजे ४८० इतकी आहे. रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली येणारे सहसा वाचत नाहीत, हेच या आकडेवारीवरून दिसून येते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:38 am

Web Title: railway crossing accident issue in thane
Next Stories
1 डोंबिवलीत भररस्त्यात मंडप
2 येऊर रक्षणासाठी पोलीसमित्र
3 धोकादायक रूळवाट : वेळ, पैसा वाचविण्यासाठी जिवाची बाजी
Just Now!
X