डोंगरावर धावणारी देशातील पहिली रेल्वेसेवा असा गाजावाजा करीत काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या श्रीमलंगगड डोंगरावरील फ्युनिक्युलर प्रकल्पाचे काम गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे थांबले आहे. भौगोलिक अडचणी, आर्थिक चणचण आणि अन्य कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र त्यामुळे स्थानिकांसोबत येथे येणाऱ्या पर्यटकांची आबाळ सुरूच आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत टाकण्यात आलेल्या रेल्वे रुळांना आता गंज चढू लागला असून देखरेख नसल्याने या ठिकाणी असलेले लोखंडी सामानदेखील चोरीस जाऊ लागले आहे.

मलंडगडावर सुमारे दीड-दोनशे घरे आहेत. याशिवाय गडावर नियमितपणे भाविकांचा राबता असतो. पायी चालून जाण्याव्यतिरिक्त सध्या तरी गडावर जाण्यासाठी कोणतेही दळणवळणाचे साधन नाही. वृद्ध, महिला, लहान मुले यांना दोन तास चढून जाण्याचा हा प्रवास झेपत नाहीत. गडावर डोलीने वर जाण्याची व्यवस्था आहे. मात्र त्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. गडावरील रहिवाशांना तर त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी बारा महिने हा द्रविडी प्राणायाम करावा लागतो. पावसाळ्यात अथवा आजारपणात स्थानिकांचे खूप हाल होतात. या पाश्र्वभूमीवर मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडी गावापासून थेट डोंगरावर रेल्वेसेवा सुरू करण्याची योजना आखण्यात आली.

या प्रकल्पाचे कामही मोठा गाजावाजा करीत सुरू करण्यात आले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे काम पूर्णपणे बंद पडले आहे.

२००८ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून काम सुरू होण्यासाठी २०१२ साल उजाडले. गेल्या डिसेंबपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र शासन आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे प्रकल्प रेंगाळला असा आरोप स्थानिक रहिवासी करीत आहेत.

असा आहे प्रकल्प

श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडी गावाजवळ स्थानक उभारून तिथून थेट डोंगरावर हा १.१७ किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्यात येत आहे. गडावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. रेल्वेमुळे अवघ्या पाच मिनिटांत गडावर जाता येणार आहे. दोन डब्यांच्या या गाडीतील एका डब्यातून प्रवासी तर दुसऱ्या डब्यातून सामानाची वाहतूक केली जाणार आहे. एका डब्यात साठ प्रवाशांना प्रवास करता येईल. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला या प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे.

नैसर्गिक कारणांमुळे प्रकल्पाला विलंब होत आहे. या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रूळ टाकण्यासाठी एकूण शंभर खांब उभारावे लागणार आहेत. त्यापैकी ८१ खांब उभारण्यात आले आहेत. मात्र पुढे खोल दरी असून तिथे काम करण्यासाठी अनुभवी तज्ज्ञ मिळत नव्हते. आता ती समस्या दूर झाली असून प्रकल्पाचे काम सुरू आहे. शासनाने आम्हाला उर्वरित बांधकामासाठी मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्या वेळेत हे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण प्रकल्प रेंगाळल्यामुळे आधीच आमचेही बरेच नुकसान झाले आहे. – झहीर शेख, सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर