News Flash

वांगणी, बदलापुरच्या रेल्वे प्रवाशांत ‘लोकलयुद्ध’

आठवडाभरापूर्वी याच मुद्दय़ावर चालत्या लोकलमध्ये वादही झाला होता.

संग्रहीत छायाचित्र.

बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलमध्ये जागा अडवल्यावरून वाद

गेल्या अनेक दिवसांपासून लोकलमधील जागेवरून सुरू असलेला वांगणी आणि बदलापूरच्या प्रवाशांतील वाद आता थेट पोलिसी कारवाईपर्यंत पोहोचला असून बदलापूरकर प्रवाशांच्या तक्रारीवरून वांगणीतील प्रवाशांवर कारवाई केल्याने वांगणीकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. बदलापूरवरून सुटणारी गाडी असूनही वांगणीकर कसे बसतात, अशा वादामुळे वांगणी आणि बदलापुरात नवे लोकलयुद्ध पाहायला मिळते आहे.

बदलापूरहून मुंबईसाठी सोडण्यात येणाऱ्या चार लोकल या वांगणी रेल्वे स्थानकाजवळील खुल्या यार्डात थांबवलेल्या असतात. त्यामुळे पहाटेच्या वेळी वांगणीतील रेल्वे प्रवासी या लोकलमध्ये प्रवेश करून जागा मिळवतात. त्यामुळे स्थानकात प्रवेश करीत असलेली धावती लोकल पकडूनही बदलापूरकरांना गाडीत बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे प्रवासी संतापले आहेत. अनेकदा वांगणी आणि बदलापूरमधील प्रवाशांच्या याच हक्काच्या जागेवरून खटके उडतात. आठवडाभरापूर्वी याच मुद्दय़ावर चालत्या लोकलमध्ये वादही झाला होता. त्यामुळे बदलापूरच्या काही प्रवाशांनी याबाबत बदलापूर ते मुंबई अशा सर्वच अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावर तात्काळ कारवाई करत रेल्वे पोलिसांनी वांगणी येथील यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांवर कारवाई केली. त्यानंतर त्यांना एका खाजगी टेम्पोमध्ये बसवून थेट कल्याण कोर्टमध्ये हजर केले. प्रवाशांनी रेल्वे पोलिसांच्या या कारवाईविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. वांगणी येथील यार्ड २०१४ पासून कार्यरत आहे. त्यामुळे तेव्हापासून वांगणी येथील प्रवासी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमधून प्रवास करतात. कर्जतहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवासी या लोकलमध्ये चढत असून त्यातून रेल्वेला काहीही नुकसान होत नाही. मात्र फक्त बदलापूरकरांच्या हक्काच्या जागा जात असल्यानेच ही कारवाई केली गेली असल्याच्या भावना वांगणीतील प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. या रेल्वे पोलिसांच्या कारवाईचा उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेने निषेध केला असून वांगणीतही रेल्वेचे प्रवासी आहेत, त्यांचाही मानवतेच्या भावनेतून विचार करावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मनोहर शेलार यांनी केली आहे. तसेच रेल्वेची उद्घोषणा यंत्रणा सुरू असताना एकदाही याबाबत रेल्वेतर्फे कारवाईची सूचना का देण्यात आली नाही, रेल्वे पोलिसांनी थेट कारवाई का केली नाही, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात दोन शहरांतील प्रवाशांमधील वाद रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि प्रशासनाने मध्यममार्ग काढावा, अशी प्रवासी संघटनेची अपेक्षा आहे.

‘त्या’ लोकल वांगणीतून सोडाव्यात

वांगणीच्या यार्डातून सोडल्या जाणाऱ्या लोकलपैकी किमान दोन लोकल या वांगणीतून चालवाव्यात, अशी मागणी वांगणीकरांनी केली आहे. वांगणीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे अकरा किलोमीटर एखादी लोकल खाली नेण्यापेक्षा तिचा वापर वांगणीच्या प्रवाशांसाठी का होऊ  नये, असा सवालही प्रवासी करत आहेत. कर्जतहून ठरावीकच लोकल येत असल्याने अनेकदा वांगणीच्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. त्यात वांगणीत लोकल असूनही त्यात बसण्याचा हक्क मिळत नसेल तर नव्या लोकल तरी द्या, अशीही मागणी आता समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:25 am

Web Title: railway issue vangani to badlapur
Next Stories
1 आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भातशेती
2 ऑनलाइन, बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण.
3 गुन्हे वृत्त : लाखांची चोरी
Just Now!
X