|| भगवान मंडलिक

डोंबिवलीत भूमाफियांच्या कारवायांमुळे रेल्वे मार्गाला धोका; रेतीबंदर मोठागाव-देवीचा पाडा भागातील प्रकार :- बेकायदा इमारती, चाळींना पाणीपुरवठा करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरीची जोडणी भूमाफियांकडून घेतली जाते. जमीन, नाले, गटारांमधून या वाहिन्या नेण्यासाठी आता जागा उपलब्ध नसल्याने भूमाफियांनी रेल्वे रुळाखालून चोरीच्या जलवाहिन्या टाकण्याचा उद्योग डोंबिवलीत रेतीबंदर मोठागाव-देवीचा पाडा भागात केला आहे. त्यातून रुळाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा, रेतीबंदर परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती, चाळी दिवा-कोपर-वसई रेल्वे मार्गालगत बांधल्या जात आहेत.

हा मार्ग डोंबिवलीत मोठागाव, रेतीबंदर, देवीचा पाडा भागातून गेला आहे. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंकडील रहिवाशांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यामुळे अस्वस्थ झालेले रहिवासी स्थानिक नळजोडणाऱ्यांना (प्लम्बर) हाताशी धरून रात्रीच्या वेळेत महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीला भोक पाडतात. त्या मुख्य जलवाहिनीतून नळजोडण्या घेऊन २४ तास पालिकेला देयक न भरता फुकटचे पाणी वापरतात. या चोरीच्या नळजोडण्यांची पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कोणतीही नोंद नसते. महापालिकेत वावरणारे दलाल, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कनिष्ठ, उपअभियंते यांना हे प्रकार माहिती असूनही ते याकडे कानाडोळा करतात.

रेतीबंदर रेल्वे फाटक, वेताळवाडी-मोठागाव, अतिथी हॉटेलजवळील बाजूच्या गल्लीतून रेल्वे रुळाखालून आणलेल्या अनेक चोरीच्या जलवाहिन्या सध्या पाहण्यास मिळत आहेत. आपण राष्ट्रीय संपत्तीला धोका पोहचवत आहोत. हजारो प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहोत याचे भान माफियांना नाही. चोरीच्या जलवाहिन्या रेल्वे रुळाखालून टाकण्याची कामे रात्रीच्या वेळेत केली जातात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

रेल्वे कामगार या ठिकाणाहून दररोज जातात. त्यांना या चोरीच्या जलवाहिन्या दिसत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका, रेल्वे अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने भूमाफिया रेल्वे रुळाखालून चोरीच्या जलवाहिन्या घेण्यासाठी सक्रिय झाले आहेत. रेल्वे मार्गालगतच्या बहुतांशी चाळींमध्ये अशाच प्रकारच्या रुळाखालून आणलेल्या चोरीच्या जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा  केला जात आहे. रूळ कमकुवत करण्याचा प्रयत्न जलवाहिनी मोठी असली की ती रुळाखालून जात नाही. अशा वेळी वाहिनी टाकणारे कारागीर रुळाखालील खडी बाजूला करतात. तेथील रूळ आणि स्लिपरमधील जोडसांधा सैल करतात. मग गोलावर नळजोडणी रुळाखाली टाकली जाते. अशा प्रकारे रूळ कमकुवतकरण्याचा प्रयत्न या भागात माफियांकडून सुरू आहे.

रेल्वे रुळाखालून जलवाहिन्या घेणे हा गंभीर प्रकार आहे. यासंदर्भातची तक्रार थेट विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन यांच्याकडे केली तर या जलवाहिन्या घेणाऱ्या वाहिन्यांवर तातडीने कारवाई होऊ शकते. ही माहिती वरिष्ठांपर्यंत कोणत्याही माध्यमातून पोहचली तर कायदेशीर कारवाई याप्रकरणात होऊ शकते. – ए. के. सिंग,  जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे