कळवा, मुंब्रा, दिवा आदी स्थानकांवरून सकाळी मुंबईला येण्यासाठी गाडी पकडणाऱ्या सर्वानाच हे दिव्य काय आहे, याची कल्पना आहे. कदाचित रेल्वेलाही या दिव्याची थोडीशी जाणीव दिवा स्थानकातील रेल्वे रोकोनंतर झाली असावी. म्हणूनच आता रेल्वेने दिवा स्थानकाचा कायापालट करण्याची योजना आणली आहे.
शुद्ध मराठीत घुबडाला ‘दिवाभीत’ म्हणतात. घुबड नेहमीच अंधारात वावरते. त्याला प्रकाशाचा किरणही सहन होत नाही. मात्र सध्याच्या काळात एवढे शुद्ध मराठी कोणीच बोलत नाही. पण दिवाभीत म्हटल्यावर एक वेगळीच प्रतिमा डोळ्यासमोर तरळते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशाची! खासकरून दिवा स्थानकातून दर सकाळी मुंबईसाठी गाडी पकडणाऱ्या प्रवाशाची!
कळवा, मुंब्रा, डोंबिवली आदी स्थानकांच्या तुलनेत जंक्शन असूनही दिवा स्थानक नेहमीच उपेक्षित राहिले आहे. गेल्या काही वर्षांत या स्थानकाभोवती अनेक इमारतींचे जाळे पसरले. यातील अधिकृत बांधकामे किती आणि अनधिकृत मजले किती, यावर कदाचित वाद होऊ शकेल. पण दिवा येथील लोकसंख्या वाढली, हे नक्की खरे. पण या स्थानकातील लोकांच्या नशिबी नेहमीच भरलेल्या गाडय़ा आणि दरवाजावर लटकणारी गर्दी! कळवा-मुंब्रा स्थानकांची अवस्थाही काही फार वेगळी नाही. पण दिवा स्थानकात काही दिवसांपूर्वी प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्याची जागा रेल्वे रोको आंदोलनाने घेतली आणि प्रवाशांच्या या भावना थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात दिवा येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्यांची तड लावण्याबाबत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
रेल्वेमंत्र्यांनी आपले आश्वासन पाळत गेल्याच आठवडय़ात दिवा स्थानकाच्या कायापालटाचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आता दिवा स्थानकात जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी रचना बदलण्यात येणार आहे. या नव्या रचनेनुसार सध्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या पश्चिमेकडे नवा ट्रॅक टाकण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकडे जाणाऱ्या धीम्या गाडय़ा या नव्या ट्रॅकवरून जातील. तर सध्याच्या डाउन दिशेच्या ट्रॅकवरून सीएसटीकडे येणाऱ्या धीम्या गाडय़ांची वाहतूक होईल. तर सध्या अप दिशेकडील प्लॅटफॉर्मचा वापर जलद गाडय़ांच्या थांब्यासाठी करण्यात येईल.
रेल्वेने दाखवलेले हे स्वप्न प्रत्यक्षात कधी येईल, याबाबत अनेक शंका आहेत. मात्र हे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे काम झाल्यास भविष्यात या स्थानकातून एखादी दिवा लोकलही सोडता येईल. त्यामुळे त्याचा फायदा कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांनाही मिळेल. मात्र या सर्व भविष्यातील योजना आहेत. या पूर्ण होण्यासाठी किमान तीन ते चार वष्रे लागणार आहेत. सध्या मुंब्रा स्थानकाच्या पश्चिमेकडील प्लॅटफॉर्मच्या बाजूला नवीन लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. हेच काम पुढे नेऊन मुंब्रा खाडीवरून ही लाइन दिव्यापर्यंत घेऊन जाण्याचा विचार रेल्वे करत आहे. मात्र या कामात भविष्यात खारफुटी जंगलांचा अडसर येऊ शकतो. याआधीच या पट्टय़ातील खारफुटी जंगले वाळूसाठी उद्ध्वस्त केली आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होणार आहेच. मात्र या नव्या माíगकेसाठी दिवा येथेही रेल्वेला आपल्या काही इमारती हलवाव्या लागणार आहेत.
त्याचप्रमाणे रुळांमध्येही काही बदल करावे लागणार आहेत. हे काम पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी रेल्वेला विशेष ब्लॉकही घ्यावे लागतील. त्यामुळे आताच धीम्या गतीने होणारी ठाण्यापुढील वाहतूक भविष्यात आणखीनच धीम्या गतीने पुढे सरकणार आहे. पण दीर्घकालीन फायदा पाहता प्रवासी ही गरसोयही सहन करतील. पण प्रत्यक्षात सध्या ‘दिवा’भीतासारखा प्रवास करणाऱ्या दिवावासीयांना रेल्वेने दाखवलेले हे स्वप्न ‘दिवास्वप्न’ ठरू नये, एवढीच इच्छा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2015 12:15 pm