ठाणे येथील रेल्वे स्थानकामध्ये सोमवारी सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या कोचुवेल्ली गरीबरथ या गाडीतून फलाटावर उतरताना के. व्ही. चंद्रन (४२) या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. फलाट आणि गाडी यांच्यातील पोकळीत पडून त्यांना जीव गमवावा लागल्याची माहिती पुढे आली आहे. चंद्रन हे मूळचे दक्षिण भारतातील थिरूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली.
‘गाडीचे पायदान आणि फलाटामधील अंतराकडे लक्ष द्या’ अशी उद्घोषणा प्रत्येक उपनगरीय गाडीमध्ये होत असली, तरी लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये अद्याप अशाप्रकारच्या सूचना केल्या जात नाहीत. त्यामुळे लोकल गाडय़ांच्या अपघाताप्रमाणेच मेल गाडय़ांमध्येही अपघात होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दक्षिण भारतातून मुंबईच्या दिशेने येणारी कोचिवली गरीबरथ गाडी सकाळी ११.५० वाजता ठाण्यात दाखल झाली.
ही गाडी फलाट क्रमांक आठवर येत असताना त्या गाडीतून प्रवास करणारे के. व्ही. चंद्रन यांनी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तोल गेल्याने ते फलाट आणि गाडीच्या पोकळीत अडकून जखमी झाले.
सहप्रवासी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. फलाटाचा काही भाग तोडून चंद्रन यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तत्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली.