‘रेल्वे आणि रेल्वे प्रवासाशी संबंधित अनेक समस्या’ प्रवाशांना भेडसावीत असतात. हे काम कठीण आहे. या कामातून कोणतीही लोकप्रियता मिळत नाही. हे काम करणे म्हणजे दगडावर डोके आपटण्यासारखे असून या कामासाठी कार्यकर्तेही मिळत नाहीत. ‘तू हे काम मनापासून आणि तळमळीने कर’ अशी सूचना दिवंगत खासदार आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींमध्ये आदराचे स्थान असलेले अभ्यासू लोकप्रतिनिधी रामभाऊ म्हाळगी यांनी भालचंद्र लोहोकरे यांना केली. म्हाळगी यांची ही सूचना लोहोकरे यांनी शिरोधार्य मानली आणि १९७८ पासून रेल्वे प्रवाशांच्या समस्या हेच आपले कार्यक्षेत्र मानले ते आजतागायत. वयाच्या ७८ व्या वर्षांत असलेल्या लोहोकरे यांच्यावर आता वयोपरत्वे काम करण्याची मर्यादा आली असली तरी दूरध्वनी, पत्राच्या माध्यमातून ते आजही या क्षेत्रातील मंडळींच्या संपर्कात राहून आपले काम करत आहेत. या क्षेत्रात ते ‘रेल्वे प्रवासीमित्र’ म्हणूनच ओळखले जातात.

लोहोकरे हे मूळचे सोलापूरचे. त्यांचे शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापुरात झाले. वडील यशवंत (बाबूराव) हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, तर आई इंदिरा (माई) राष्ट्र सेविका समितीची कार्यकर्ती. त्यामुळे घरी कार्यकर्ते व माणसांचा सतत राबता असायचा. सामाजिक सेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. वाणिज्य शाखेतील पदवीनंतर त्यांनी ‘एलएलबी’ केले. पुढे १९६२ मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक खात्यात ‘ज्युनिअर ऑडिटर’ म्हणून काही काळ नोकरी केली. त्यानंतर ‘ब्रॅडमा ऑफ इंडिया लिमिटेड’ या कंपनीत ते रुजू झाले आणि दीर्घ सेवेनंतर ऑक्टोबर १९९८ मध्ये ‘सीनिअर अकाऊंट्स मॅनेजर’ या पदावरून निवृत्त झाले. १९६८ मध्ये डोंबिवलीत राहायला आल्यानंतर ते जनसंघाशी जोडले गेले. पक्षात विविध जबाबदाऱ्या पार पाडताना आणीबाणीच्या काळात त्यांनी १४ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. डोंबिवली नगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले.

१९७८ मध्ये डोंबिवली नगर परिषदेतर्फे उपनगरीय रेल्वे उपभोक्ता प्रवासी सल्लागार समितीवर त्यांची नेमणूक करण्यात आली आणि ते रेल्वे प्रवाशांच्या कामाशी जोडले गेले ते कायमचेच. याच काळात ठाणे ते कर्जत आणि ठाणे ते कसारा या मार्गावरील विविध प्रवासी संघटना एकत्र आल्या आणि रामभाऊ म्हाळगी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी येथील समस्यांसंदर्भात ‘लोकसभा पिटीशन’ तयार केले. म्हाळगी यांनी ते लोकसभेत सादर केले; पण त्यावर सुनावणी होण्यापूर्वी केंद्रातील जनता पक्षाचे सरकार गडगडले. पुन्हा निवडणुका झाल्यानंतर नवीन लोकसभेसमोर यांचेच पिटिशन पहिले ठरले. या पिटिशनमधील १६ पैकी १३ मागण्या मान्य झाल्या.

पुढे म्हाळगी यांच्या सूचनेनुसार लोहोकरे यांनी १९७८ पासून ‘डोंबिवली पॅसेंजर असोसिएशन’ आणि ‘मुंबईतील फेडरेशन ऑफ बॉम्बे सबर्बन पॅसेंजर्स असोसिएशन्स’ या संघटनांसाठी काम करायला सुरुवात केली. सुरुवातीची काही वर्षे कोणतेही पद न घेता त्यांनी दोन्ही संघटनांचे काम केले. लोहोकरे यांची कामाची पद्धत, तळमळ आणि ध्यास यामुळे पुढे दोन्ही संघटनांच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. या सर्व कामात आपल्याला रामभाऊ म्हाळगी यांच्यासह राम नाईक, राम कापसे, अ‍ॅड. भाऊ सबनीस यांचे मार्गदर्शन व सक्रिय पाठिंबा मिळाला. या दिग्गजांमुळेच आपण या क्षेत्रात थोडेफार काम करू शकलो, असे लोहोकरे आवर्जून सांगतात.

या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून काम करताना त्या काळात रेल्वेची झालेली प्रचंड दरवाढ कमी करण्यात सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने लोहोकरे यांना यश मिळाले. तसेच रेल्वे मंत्रालयाकडे संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे मध्य रेल्वेवर बारा डब्यांच्या उपनगरी गाडय़ा सुरू करणे, दादर टर्मिनसची उभारणी आणि कळवा कारशेड या महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्या आणि पुढे त्या प्रत्यक्षातही साकार झाल्या. डोंबिवली रेल्वे टर्मिनसची उभारणी आणि डोंबिवली लोकल याचाही लोहोकरे यांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. आमदार आणि खासदार असताना राम कापसे यांनीही हा प्रश्न धसास लावण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि पाठपुरावा केला व अखेर डोंबिवली लोकलचे स्वप्न पूर्ण झाले. याचे मोठे समाधान आणि आनंद लोहोकरे यांना आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात किंवा मध्य रेल्वेच्या कोणत्याही स्थानकांवर स्कायवॉक नसताना लोहोकरे यांनी १९९०-९२ मध्ये डोंबिवलीत स्कॉयवॉक बांधण्याची संकल्पना आणि आवश्यकता कल्याण-डोंबिवली महापालिका व रेल्वे प्रशासनापुढे मांडली. प्रत्यक्ष भेट, निवेदने, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा केला आणि त्याचे फलित म्हणजे डोंबिवलीत उभारलेले स्कायवॉक. मध्य रेल्वेवर उभारण्यात आलेला हा पहिला स्कायवॉक असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

रेल्वे प्रवाशांना एखादा प्रश्न भेडसावितो किंवा एखादी महत्त्वाची समस्या त्यांच्यासमोर उभी राहते, तेव्हा प्रवाशाने रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्राद्वारे ती समस्या कळवावी, त्या समस्येबाबत रेल्वे प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करावा, रेल्वेच्या गोंधळाच्या परिस्थितीत प्रवाशांनी कधीही हिंसक होऊन कायदा हातात घेऊ नये किंवा रेल्वेची तोडफोड करू नये, गणवेशातील पोलीस किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर हात उचलू नये, असा सल्लाही ते प्रवाशांना देतात. आता वयोपरत्वे प्रवास करणे, प्रत्यक्ष भेटीगाठी घेणे शक्य नसल्याने रेल्वे समस्यांबाबत त्यांनी ‘थिंक टँक’ तयार केला आहे. अ‍ॅड. भाऊ सबनीस, श्रीकृष्ण शिदोरे, विलास गुप्ते, एम. वाय. कर्णिक, सूर्यकांत देशमुख, गिरिधर भाटिया, प्रभाकर जोशी या जुन्या सहकाऱ्यांसह नव्या पिढीला बरोबर घेऊन त्यांचे काम सुरू आहे. कल्याण ते ठाणे रेल्वे समांतर रस्ता, ठाणे, कल्याण व पालघर या तीन जिल्हय़ांसाठी वाहतुकीचा वेगळा विभाग स्थापन करून या परिसरातील रस्ता वाहतूक सुधारणे, महापालिकांच्या अंतर्गत बससेवेला प्राधान्य देणे, त्यांचा विस्तार वाढविणे, मध्य रेल्वेवरील अप्पर कोपर या स्थानकाच्या फलाटांची लांबी वाढवून तिथे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाडय़ांना थांबा देणे आदी योजना डोळ्यासमोर आहेत.

आजवरच्या या सर्व कामांत पत्नी स्नेहलता, नीलाक्षी आणि पुष्कर हा मुलगा, सून, जावई यांचा नैतिक पाठिंबा असल्याचे ते सांगतात. कोणतीही अपेक्षा न ठेवता किंवा कोणताही लाभ कसा होईल याचा विचार न करता मी आजवर काम करत आलो. त्याचा फायदा लोकांना, प्रवाशांना झाला. त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली याचे मोठे समाधान आणि आनंद लोहोकरे यांना आहे. आयुष्याच्या या वळणावर ते कृतार्थ आहेत.

भालचंद्र लोहोकरे संपर्क – ९८१९४६९८१५