किशोर कोकणे, ठाणे

पाऊस नसतानाही वारंवार सुरू असणाऱ्या लोकल गाडय़ांच्या गोंधळामुळे संतापलेल्या प्रवाशांची बाजू उचलून धरत आठवडाभरापूर्वी रेल्वे प्रशासनाची भेट घेणाऱ्या ठाणे, डोंबिवलीतील प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांनी आश्वासनावर बोळवण केली. कोणत्याही परिस्थितीत लोकल गाडय़ा वेळेवर सुरू होतील या आश्वासनाला भुलून प्रवासी संघटनांनीही आंदोलन मागे घेतले. मात्र आश्वासनानंतरही लोकलहाल आणखी वाढल्याने प्रवासी संघटनांनी येत्या आठवडय़ाभरात रेल्वे प्रशासनाविरोधात जनआंदोलन उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेच्या कारभाराविषयी संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संतापाचा उद्रेक समाजमाध्यमांवरूनही होत आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रवासी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उगारण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी एक ते दोन दिवसांत बैठक घेण्याची तयारी प्रवासी संघटनांनी सुरू केली आहे. रेल्वे प्रवासी संघटनांची बैठक झाल्यानंतर प्रशासनाने वेळापत्रकाचे नियोजन केलेले नाही. या बैठकीत प्रवासी संघटनांच्या प्रश्नांनादेखील मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नव्हती. त्यामुळे आता आंदोनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय नाही, असे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे ठाकुर्ली प्रतिनिधी तन्मय नवरे यांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्णपणे फोल ठरत असल्याचे दिसत आहे.१ जुलैचे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी दोन दिवसांत प्रवासी संघटनांची पुढील बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढची दिशा ठरेल.

– अ‍ॅड. आदेश भगत, उपाध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ.