News Flash

जखमीच्या मदतीला धावलेल्या रेल्वे पोलिसाचा अपघाती मृत्यू

रेल्वे रुळांवर पडलेल्या जखमीला मदत करण्यासाठी गेलेल्या रेल्वे पोलीस शिपायाचा बुधवारी रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला.

मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यानची घटना

रेल्वे रुळांवर पडलेल्या जखमीला मदत करण्यासाठी गेलेल्या रेल्वे पोलीस शिपायाचा बुधवारी रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाला. श्रीमंत डोंबाळे (४९) असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते डोंबिवली येथील राहणारे होते. ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या डोंबाळे यांना मुंब्रा-कळवा स्थानकांदरम्यान रेल्वेतून पडून प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली. या प्रवाशाला वाचवण्यासाठी धावलेल्या डोंबाळे रेल्वे रुळावर उतरले असता दोन्ही बाजूंनी आलेल्या लोकल गाडय़ांमुळे त्यांचा तोल गेला. रेल्वेचा जबरदस्त धक्का लागून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

रेल्वे गाडय़ांमधील गर्दीमुळे रेल्वे रुळांवर पडणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला प्रथम रेल्वे पोलिसांना जावे लागते. डोंबाळे हे बुधवारी सकाळी मुंब्रा स्थानकात कार्यरत होते. सकाळी १० वाजताच्या दरम्यान मुंब्रा व कळवा स्थानकांदरम्यान एक प्रवासी जखमी अवस्थेत पडल्याची माहिती डोंबाळे यांना समजताच ते मदतीसाठी धावले.

ते घटनास्थळी जात असताना कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद व धिम्या गतीच्या मार्गावर व मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गतीच्या रेल्वे मार्गावर लोकल गाडय़ा धावत होत्या. त्यापैकी एका लोकलची त्यांना धडक बसली. या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

जखमी अवस्थेत त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डोंबाळे हे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात शिक्षिका असलेली पत्नी आणि दोन मुले असा परिवार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जखमी सुशांतचे प्राण वाचले

मुंब्रा ते कळव्यादरम्यान दिवा भागात राहणाऱ्या सुशांत मंथो हा तरुण सकाळी सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून जखमी झाला होता. त्याच्या मदतीसाठी श्रीमंत डोंबाळे रेल्वे रुळांवर उतरले होते. मात्र त्यांचा अपघाती मृत्यू झाला. तर जखमी सुशांतवर प्राथमिक उपचार करून त्याला त्याच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे, अशी माहिती ठाणे रेल्वे पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:39 am

Web Title: railway police accidental death in kalwa
Next Stories
1 कळवा-मुंब्रा दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत
2 मंडईपेक्षा मॉल स्वस्त!
3 सुशोभित ठाणे स्थानकावर प्रवाशांच्या पिचकाऱ्या!
Just Now!
X