18 February 2019

News Flash

रेल्वेतील भुरटे चोर, जीवाला घोर!

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या संख्येने ७० लाखांहून अधिकचा टप्पा ओलांडला असला तरी पोलिसांची संख्या मात्र अवघ्या काही हजारांमध्ये आहे.

| February 13, 2015 12:41 pm

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या संख्येने ७० लाखांहून अधिकचा टप्पा ओलांडला असला तरी पोलिसांची संख्या मात्र अवघ्या काही हजारांमध्ये आहे. रेल्वेतील गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून प्रयत्न केले जात असले तरी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कामाचा मोठा ताण पोलिसांवर आहे. यामुळे रेल्वेतील सोनसाखळी आणि भुरटय़ा चोरांचे आयते फावले आहे. प्रवाशांच्या दागिन्यांवर आणि सामानांवर हात साफ करण्याचे त्यांचे प्रताप गेल्या काही वर्षांपासून वाढले आहेत. चालत्या लोकलमधून प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरताना हे सोनसाखळी चोर प्रवाशांवर हल्ला करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमधून याची तीव्रता प्रकर्षांने जाणवू लागली आहे.   
टिटवाळा परिसरात राहणाऱ्या गायत्री मोहिते जानेवारी महिन्यात सायंकाळच्या वेळेत लोकलमधून ठाण्यातील त्यांच्या माहेरी येत होत्या. लोकलच्या दारात उभ्या असताना कळवा स्थानकामध्ये चोरटय़ाने त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. चोराच्या धक्क्याने तोल जाऊन त्या फलाटावर पडल्या. पाठीला प्रचंड मार लागल्याने त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कळवा पारसिकनगर येथे राहणाऱ्या शैला शिंपी धुळ्यावरून अमृतसर एक्स्प्रेसने ठाण्यात येत असताना पहाटेच्या सुमारास ठाणे स्थानकाजवळ गाडीचा वेग मंदावल्याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी त्यांच्या हातातली बॅग खेचली. रेल्वेच्या दारात बेसावध असलेल्या शैला यांचा तोल जाऊन त्या गाडीतून खाली कोसळल्या. या भीषण अपघातामध्ये शैला शिंपी यांचा मृत्यू झाला. ठाण्यातील प्रा. स्नेहलता पगारे मुलुंडवरून ठाण्यात येत असताना मंदावलेल्या लोकलच्या दारात उभ्या असलेल्या पगारे यांच्या हातातील पर्स घेऊन चोरटय़ाने पोबारा केला. या अपघातामध्ये पगारे लोकलमधून पडता पडता वाचल्या. गेल्या सहा महिन्यांतील या घटनावरून रेल्वे प्रवासातील भुरटय़ा चोरांच्या वाढत्या उपद्रवाची तीव्रता जाणवल्याशिवाय राहणार नाही.
रेल्वेतील भुरटय़ा चोरांचा उपद्रव मुंबईकरांसाठी नवा नसला तरी त्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढ होत असून पाकीटमारी करणाऱ्या चोरटय़ांनी सोनसाखळी, महिलांच्या पर्स आणि मोबाइल चोरीचा सपाटा सुरू केला आहे. फलाटांवर उभे राहून लोकलच्या दारात उभ्या असलेल्या महिलांच्या गळ्यातील, हातातील पर्स खेचून पळ काढणे हे प्रकार आता नित्याचे होऊ लागले आहेत.   

येवा दिवा आपलाच असा..

मध्य रेल्वेवरील दिवा स्थानक अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे चोरटय़ांचे प्रमुख लक्ष्य ठरले आहे. कोकण रेल्वे मार्गवरून येणाऱ्या गाडय़ांमधून गावातून लग्न समारंभाच्या निमित्ताने, सणावार निमित्ताने दागिने घालून येणाऱ्या महिला अधिक असल्याने दिवा स्थानकात त्यांची लूट करण्यासाठी चोर टपलेलेच असतात. पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने स्थानकामध्ये रात्री आणि सायंकाळच्या वेळेत पुरता अंधार पसरलेला असतो. या संधीचा फायदा घेऊन खिडकीतून अथवा दरवाज्यातून महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून चोरटे पलायन करतात. या भागात सर्वाधिक सोनसाखळी चोरीचे प्रमाण असल्याचे प्रवासी संघटनांच्या तक्रारीवरून दिसून येते.  

दक्ष प्रवाशांचा सन्मान..

रेल्वेमार्गावरील गुन्ह्यांना चाप बसवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मदतीसाठी आवाहन केले. पोलिसांना मदत करणाऱ्या आणि चोरटय़ांना पडून देणाऱ्या प्रवाशांचाही पोलिसांकडून सन्मान केला जात असून त्यांना बक्षिसाची घोषणाही करण्यात आली आहे, तसेच पोलिसांच्या मंजूर पदांची पूर्तता लवकर करण्यासाठी वरिष्ठांना विनंती केली असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ए. जी. खान यांनी दिली.

ठाणे अव्वल..
रेल्वे स्थानके चोरटय़ांचे अड्डे बनू लागले असून २०१४ मध्ये वर्षभरामध्ये ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाल्याची पोलिसांची आकडेवारी सांगते. वर्षभरामध्ये ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात ४७० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील गेले वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास पाकीटमारीच्या ७०१, सोनसाखळी चोरीच्या २२६ तर पर्सचोरीच्या १९८ घटना घडल्या असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

रेल्वेतून प्रवास करताना काळजी घ्या..
* हिरे, सोन्या चांदिचे दागिने अशा सारख्या किमती आणि मौल्यवान वस्तु घेऊन लांबचा प्रवास टाळा.
* लोकल गाडी पकडण्यासाठी घाई करून नका या गडबडीमध्ये चोरटय़ांना संधी मिळते.
श्रीकांत सावंत

First Published on February 13, 2015 12:41 pm

Web Title: railway police fail to stop chain snatching and robbery cases in local train