प्रवेशद्वार अडविणाऱ्या प्रवाशांवर कारवाई; ७ लाखांचा दंड वसूल

विरार : लोकलच्या डब्यात प्रवेशद्वारावर उभे राहून इतर प्रवाशांचा मार्ग रोखणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने व्हॉटसअ‍ॅपचा सुरू केलेला प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. अरेरावी करणारे तब्बल १४०० प्रवासी या व्हॉटसअ‍ॅपच्या जाळ्यात अडकले असून त्यांच्यावर कारवाई करून सात लाख रुपयांचा दंड वसूल करम्ण्यात आला आहे.

विरार लोकलमध्ये प्रवाशांची नेहमी गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी काही प्रवासी प्रवेशद्वारात उभे राहून इतर प्रवाशांची वाट अडवत असतात. अशा प्रवाशांमुळे लोकल सुटणे, धक्काबुक्की होणे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असे.  या प्रवाशांवर कारवाई करणे रेल्वे सुरक्षा बलाला कठीण जात होते. यावर उपाय म्हणून  रेल्वे सुरक्षा बलाने व्हॉटसअ‍ॅपचा आधार घेण्याचे ठरवले. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.   व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरून कारवाई करण्याची ही अनोखी शक्कल चांगली यशस्वी झाली. डिसेंबरपर्यंत दार अडविणाऱ्यांविरोधात एक हजार ४२८ गुन्हे दाखल झालेले आहेत. या प्रवाशांकडून सात लाख १४ रुपये इतका दंड वसूल झालेला आहे.

विशेष पथक

प्रवेशद्वार अडविणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी विशेष  पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पथकात पाच जणांचा समावेश करण्यात आला.  ही पथके प्रत्येक स्थानकावर तैनात करण्यात आली आहेत. त्या सर्वाचा एक व्हॉटसअ‍ॅप ग्रुप बनविण्यात आला आहे. एका स्थानकात प्रवेशद्वार अडविणारे प्रवासी दिसले की अशा प्रवाशांची छायाचित्रे, चित्रफिती काढून हे पथक या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये ते फॉरवर्ड करते. त्यामुळे लोकल पुढच्या स्थानकात आली की व्हॉटसअ‍ॅपवर आलेली छायाचित्रे पाहून या प्रवाशांना त्या स्थानकातील सुरक्षा बलाचे कर्मचारी ताब्यात घेऊन कारवाई करतात.