17 February 2020

News Flash

रेल्वेचा खांब रस्त्यावर?

पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे मुंब्य्रात वाहतुकीस अडथळा

संग्रहित छायाचित्र

पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे मुंब्य्रात वाहतुकीस अडथळा

किशोर कोकणे, ठाणे

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या कामामध्ये मुंब्रा रेतीबंदर परिसरात रेल्वे प्रशासनाकडून उन्नत मार्गिका तयार करण्यात येत आहे. मात्र, या उन्नत मार्गाचा एक खांब मुंब्रा रस्त्याच्या अगदी मधोमध येणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज हजारो अवजड वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे रेल्वेच्या मार्गिकेचा खांब रस्त्यावर आल्यास या वाहतुकीस अडथळा होण्याची भीती वाहतूक विभागाला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी मुंब्रा येथील धिम्या मार्गिकेवरील एका बोगद्याजवळून आणखी एक बोगदा तयार करून पाचवी-सहावी मार्गिका काढण्यात येणार होती. हा बोगदा धोकादायक होऊन भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या आरेखनात बदल करून मुंब्रा रस्त्यावरून खाडीलगत एक उन्नत मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेतला. खाडीकिनारी हा प्रकल्प बांधण्यात येणार असल्याने किनारपट्टी बांधकाम नियंत्रण विभागाची (सीआरझेड) परवानगी घ्यावी लागली. या परवानगीसाठी बराचसा वेळा गेला. काही महिन्यांपूर्वीच रेल्वेला खाडीकिनारा परिसरात बांधकाम करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर एमआरव्हीसीने येथे उन्नत मार्गिका तयार करून ६० टक्के बांधकाम पूर्ण केले आहे. मात्र, त्यात आता आणखी मोठा अडथळा उभा राहिला आहे. या मार्गिकेचा एक खांब मुंब्रा रस्त्याच्या मधोमध राहणार आहे. यासाठी महापालिका आणि ठाणे वाहतूक शाखेची परवानगी तसेच ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली. मात्र, रस्त्याच्या मधोमध हा खांब उभा राहिल्यास भविष्यात या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या मार्गावरून जेएनपीटीच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठाणे वाहतूक शाखा आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची काही दिवसांपूर्वीच एक बैठक झाली होती. या बैठकीत हा खांब रस्त्यामध्ये आल्यास मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होईल, असे आम्ही निदर्शनास आणून देत आरेखनात बदल करावा, अशा सूचना रेल्वेला दिल्या होत्या.

– अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा ठाणे 

First Published on July 24, 2019 3:49 am

Web Title: railway poll on the road in mumbra retibandara area zws 70
Next Stories
1 डोंबिवलीत वाघाचे कातडे जप्त
2 शहरांभोवतीचा वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार कधी?
3 वसईचा खाद्यठेवा : भंडारी समाजाचे चटकदार तिरपण
Just Now!
X