कल्याण स्थानकाच्या डागडुजीकडे रेल्वेचे दुर्लक्ष

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीची दुर्घटना झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्थानकांतील जीर्ण पूल, वास्तूंच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र कल्याण स्थानकातील उद्घोषणा कक्ष व सिग्नल नियंत्रण यंत्रणा असलेल्या इमारतीकडे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. आधीच पडझड झालेल्या या इमारतीची अवस्था अतिशय धोकादायक झाली असल्याने येथील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

मध्य रेल्वेवरील जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकाचा उद्घोषणा कक्ष आणि सिग्नल यंत्रणा अद्ययावत करण्यात आली. मात्र या इमारतीची डागडुजी करण्यात आलेली नाही. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून सिग्नल यंत्रणेचे नियंत्रण केले जाते. दुसऱ्या मजल्यावर उद्घोषणा आणि गाडय़ांचे नियोजन करणारा कक्ष आहे. पहिला आणि दुसरा मजला जोडणारे जिनेही अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत.

दरम्यान, या संदर्भात विचारणा केली असता, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी या इमारतीचीही पाहणी करून डागडुजी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.